
पथकर वाचविण्यासाठी चेसिसमध्ये बदल
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : कळंबोलीतील एका वाहतूक व्यावसायिकाने पथकर वाचवण्यासाठी ट्रेलरच्या मूळ इंजिन व चेसिस क्रमांकामध्ये फेरफार केला. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने ४५ लाख रुपयांचे तीन ट्रेलर जप्त करून व्यावसायिकाविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
कळंबोली सेक्टर ८ ई मधील बालाजी कॉम्प्लेक्स येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सहा मोटार ट्रेलरपैकी प्रत्येकी दोन ट्रेलरचे क्रमांक हे एकसारखेच असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने पाहणी केली असता त्यांना एकाच क्रमांकाचे दोन ट्रेलर असे एकूण सहा ट्रेलर आढळून आले. त्यामुळे गुन्हे शाखेने सहा मोटार ट्रेलरची आरटीओकडून तपासणी केली. त्या वेळी तीन मोटार ट्रेलरचे इंजिन व चेसिस क्रमांकाची फेरफार केल्याचे आढळून आले. तसेच त्याच क्रमांकाच्या तीन ट्रेलरचे नंबर योग्य असल्याचे आरटीओने तपासणी अहवालात माहिती दिली. त्यामुळे बनावट क्रमांक असलेले तीन मोटार ट्रेलर गुन्हे शाखा युनिट-३ ने ताब्यात घेतले.
मालकाविरोधात गुन्हा
गुन्हे शाखेला तिन्ही ट्रेलर सदर ताज फ्रेट कॅरिअर या वाहतूक कंपनीचे मालक जयपालसिंग संधू यांच्या नावे असल्याचे आढळून आले. तसेच संधू यांनी पथकर वाचवण्याच्या हेतूने त्यांच्या मूळ इंजिन व चेसिस क्रमांकांमध्ये फेरफार केला. तसेच ट्रेलरचे मूळ आरटीओ पासिंग क्रमांक गाड्यांवरून काढून त्याऐवजी मूळ वापरातील ट्रेलरचे बनावटीकरण केलेले आरटीओ नंबर वापरत सरकारची फसवणूक केली. त्यामुळे पोलिसांनी ट्रेलर मालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85861 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..