
आनंदोत्सवाने विद्यार्थ्यांच्या स्वागत
वाशी, ता. १५ (बातमीदार) ः शहरातील पालिकेसह खासगी शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. जवळपास दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. शाळा परिसर रांगोळ्या काढून, पताका लावून सजवण्यात आला होता. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. घणसोली येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळेला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विशद केले. शाळांमधील किलबिलाट ऐकून शिक्षकवर्गही भारावला होता.
नवी मुंबई महापालिकेच्या शाळा दोन दिवसांपूर्वी सुरू झाल्या होत्या, मात्र यावेळी साफसफाई, सॅनिटायजेशन करण्यात आले. खासगी शैक्षणिक संस्थांनी शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था निर्जंतुकीकरण करून ठेवली होती.
शिक्षणमंत्र्यांनी दिली भेट
अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. नव्या पुस्तकांची नवलाई, रांगोळीने सजलेले प्रवेशद्वार आणि जुन्या-नव्या सवंगड्यांना पाहून मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय आहे. शिक्षणाच्या या आनंदोत्सवात सहभाग घेता आला, याचा आनंद असल्याची भावना राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या शाळा क्र. ४२ ला त्यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांचे स्वागत केले.
नवी मुंबईतील पालिकेच्या शाळामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कोरोना नियमाचे पालन करूनच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
- जयदीप पवार, उपआयुक्त, शिक्षण, नवी मुंबई महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85871 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..