
टँकरची मागणी घटली
खारघर, ता. १६ (बातमीदार) : खारघर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत होती. सिडकोकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना टँकरचे पाणी विकत घेऊन गरजा पूर्ण कराव्या लागत होत्या, मात्र तीन दिवसांपासून खारघरमध्ये जवळपास २० एमएलडी पाणी पुरवठा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
खारघर वसाहतीची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. खारघर परिसरातील गावे आणि वसाहतीला सद्यस्थितीत ७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दैनंदिन ५० ते ५२ एमएलडी पाणीपुरवठा होतो.
पाणी समस्या दूर करण्यासाठी सिडकोने लाखो रुपये खर्च करून हेटवणे धरणातून जलवाहिन्यांद्वारे येणारे पाणी थेट उपलब्ध व्हावे, यासाठी हमरापूर येथे ७०० मीटर लांब आणि २० मीटर खोल बोगद्याचे काम पूर्ण केले. शिवाय १२०० मीटरच्या जुन्या जलवाहिनीच्या जागी १५०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण केले होते. मात्र डोंगर उतारावरील जलवाहिन्यांमुळे पाण्याचा प्रवाहास दाब मिळत नसल्याचे कारण पुढे आले होते. ही बाब लक्षात येताच, उच्च दाबाने पाणीपुरवठा प्रवाहित करण्यासाठी सूक्ष्म बोगद्याचे नियोजन केले होते. त्याची रचना तयार करण्याचे काम नाशिक येथील सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन (एसडीओ) या संस्थेला देण्यात आले होते. अखेर पाणी खेचण्यासाठी तयार केलेल्या बोगद्याच्या रचनेला सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशनकडून परवानगी देण्यात आली आहे.
सिडकोकडून तीन व चार जून रोजी अधिक पाणी खेचण्यासाठी लागणाऱ्या वाहिन्यांचे काम पूर्ण केल्यामुळे खारघर वसाहतीत २० एमएलडी अधिक पाणीसाठा उपलब्ध होत असल्यामुळे पाणी समस्या काही प्रमाणात दूर झाल्याचे दिसून येत आहे. हेटवणे धरणातील जलवाहिन्यांची कामे हाती घेण्यात आल्यामुळे खारघरमध्ये जवळपास अठरा ते वीस एमएलडी पाणी साठ्यात वाढ झाली असून सद्यस्थितीत शहराला जवळपास ७० एमएलडी पाणी उपलब्ध होत असल्याचे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
टँकरची मागणी घटली
खारघरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे सिडकोकडून अनेक सोसायट्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जायचा. खारघरमध्ये रोज दीडशे सोसायट्यांमध्ये टँकरची मागणी असायची, मात्र सिडकोकडून दैनंदिन १२० टँकर पाणी उपलब्ध करून दिले जायचे. पाणीपुरवठा वाढल्याने टँकरची मागणी कमी झाली असून रोज आठ ते दहा सोसायट्यांकडून टँकरची मागणी होत आहे. काही दिवसांत खारघरमधील पाणी समस्या दूर होईल, अशी माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.
खारघरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने, निवेदने व मोर्चे काढण्यात आले. याची दखल घेत, सिडकोने हेटवणे धरणातील अपूर्ण काम त्वरित पूर्ण केले. त्यामुळे खारघरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून अधिक पाणीपुरवठा होत आहे.
- प्रवीण पाटील, माजी स्थायी समिती सभापती/नगरसेवक खारघर
महावीर सोसायटीत दैनंदिन ४२० युनिट पाण्याची आवश्यकता आहे. सिडकोकडून २२ ते २५ युनिट पाणी प्राप्त होत असल्यामुळे टँकरने पाणी विकत घेऊन गरजा पूर्ण कराव्या लागत असत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून तीनशे युनिट पाणी उपलब्ध होत आहे.
- डॉ. सोनल दिसले, सदस्य, महावीर सोसायटी, खारघर
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85935 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..