
भरतीचे दिवस मिरा–भाईंदरसाठी चिंताजनक
भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : अरबी समुद्रातील भरती-ओहोटीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. त्यानुसार जूनसह पुढील चार महिन्यांतील साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणारे २२ दिवस वेळेसह नमूद करण्यात आले आहेत. यातील चार दिवस सरले असले तरी उर्वरित १८ दिवस मिरा-भाईंदर शहरासाठी चिंताजनक असणार आहेत. या भरतीच्या काळात मोठा पाऊस झाला तर शहरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.
मिरा-भाईंदर शहर हे समुद्रसपाटीपासून खाली आहे. शहराचा आकार बशीसारखा आहे. पावसाचे पाणी महापालिकेने बांधलेल्या नाल्यांमधून खाडीला आणि पुढे ते समुद्राला जाऊन मिळते; मात्र शहर समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे व भरतीच्या काळात समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पावसाचे पाणी बाहेर पडण्याचे मार्ग बंद होतात. उलटपक्षी बाहेरचे पाणी आत येण्याची भीती असते. त्यातच मुसळधार पाऊस झाला तर अवस्था आणखीनच बिकट होणार आहे. आधीच मिरा–भाईंदरमध्ये नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने तसेच बेकायदा माती भराव झाल्याने पाणी वाहून जाण्याचे मार्ग कमी झाले आहेत. त्यातच खाड्यांच्या किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे खाड्यांची तोंडेदेखील अरुंद झाली आहेत. त्यामुळे थोडा जास्त पाऊस झाला तरी अनेक सखल भागांत पाणी तुंबत असते. अशा परिस्थितीत मोठ्या भरतीच्या वेळी पाऊस झाला तर सखल भागात कंबरेएवढे पाणी भरते; तर काही ठिकाणी चार ते साडेचार फूट पाणीदेखील तुंबत असते.
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे; मात्र शहराची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन मोठ्या भरतीच्या दिवसांत नागरिकांनीदेखील विशेष काळजी घ्यावी.
- दिलीप ढोले, आयुक्त, मिरा–भाईंदर महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85948 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..