बचावकार्यासाठी ड्रोन वापरणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

use drones for rescue Mumbai corporation
बचावकार्यासाठी ड्रोन वापरणार!

बचावकार्यासाठी ड्रोन वापरणार!

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत ड्रोन वापरण्याची तयारी मुंबई महापालिकेने केली आहे. दरडप्रवण क्षेत्रात ड्रोन वापराची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव वॉर्ड पातळीवरून आपत्कालीन विभागाकडे आला होता. त्यामुळे लवकरच या ड्रोन वापराबाबतची स्पष्टता येणे अपेक्षित आहे. अनेकदा दरडप्रवण क्षेत्रात पावसाळ्यात दरड कोसळल्यानंतर त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती मार्ग काढणे अवघड होत असते. अशा वेळी बचावकार्य करणे हे प्राधान्य असते. पण दरड कोसळल्याने अनेकदा सगळ्याच यंत्रणांना घटनास्थळी पोहचण्याच्या वाटा बंद होतात. त्यामुळेच मदतकार्य पोहचवणे कठीण होते.

अशा वेळी ड्रोनचा वापर झाल्यास त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती कळेल, हाच त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळेच दरडप्रवण क्षेत्रात ड्रोन वापरासाठी परवानगी मिळावी म्हणून आपत्कालीन विभागाकडे ही परवानगी मागितली असल्याची माहिती एस विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली. घटनास्थळी नेमकी काय घटना घडली आहे, तसेच त्या ठिकाणी कोणत्या मदतीची गरज आहे, हे कळणे ड्रोनने शक्य होईल, म्हणून ड्रोनची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी महापालिका आयुक्तांनीही हिरवा कंदील दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अग्निशमन दलाकडून मिळणार ड्रोन
ड्रोन वापरासाठी मुंबई पोलिसांकडूनही परवानगी गरजेची आहे. त्यामुळेच या परवानगीनंतरच ड्रोनचा वापर करणे शक्य होईल; तर ड्रोनबाबतच्या धोरणाची निश्चिती, तसेच एजन्सी नेमण्याचे काम हे मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळेच या कामामध्ये आणखी कालावधी अपेक्षित आहे. म्हणूनच ड्रोनच्या वापरासाठी अग्निशमन दलाकडून ड्रोन उपलब्ध झाल्यावरच त्याचा वापर हा वॉर्ड पातळीवर करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

गेल्या वर्षी १० जणांचा मृत्यू
गेल्या वर्षी एस वॉर्डात सूर्यनगर येथे दरड कोसळून १० जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीच्या घटनेत संरक्षक भिंत कोसळून घरावर पडल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. या ठिकाणी डोंगरावरील माती वाहून आल्याने संरक्षक भिंत भर पावसात कोसळली. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. त्यामुळे अशा घटनांमध्ये मदतकार्य वेळीच पोहचावे यासाठी ड्रोनचा वापर हा रेस्क्यू ऑपरेशनसाठी होईल, असेही एस विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार यांनी सांगितले. 

फ्लाईंग झोनच्या मर्यादा 
मुंबईत फ्लाईंग झोनमुळे ड्रोन उडवण्यासाठी मर्यादा आहेत. त्यामुळेच मुंबई पोलिसांकडून ड्रोनसाठीची परवानगी गरजेची आहे. मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात महापालिकेला ड्रोन उडवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ब्लॅंकेट परमिशन घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुंबई अग्निशमन दलाकडून ड्रोन मंजूर झाल्यानंतर वॉर्डामध्ये हा ड्रोन वापरता येईल. 

ड्रोनसाठी प्रतीक्षा 
मुंबई अग्निशमन दल हे ३०० मीटर उंचीवर ड्रोन उडवण्यासाठी धोरण निश्चित करत आहे. त्यासाठी अग्निशमन दलाला फायर फायटिंगसोबतच सर्व्हेलन्स आणि रेस्क्यू अशा अनेक मदत, तसेच बचावकार्यासाठी ड्रोनची गरज आहे. त्यामुळेच मुंबई आयआयटी आणि स्टार्टअप कंपन्यांच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या गरजेनुसार ड्रोन उपलब्ध करून देण्यात येतील, पण या संपूर्ण प्रक्रियेला आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या मॉन्सूनमध्ये ड्रोन उपलब्ध होऊ शकणार नाहीत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86003 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top