
कॅम्प्स कॉर्नर मार्गावर झाडे तोडण्यात येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : बीजी खेर मार्ग ते कॅम्प्स कॉर्नरला येणाऱ्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने येथील २१ झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. ट्री ऑथेरिटीच्या परवानगीने येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
दक्षिण मुंबईतील कॅम्प्स कॉर्नर येथे दरड आणि माती गेल्या पावसाळ्यात रस्त्यावर वाहून आली होती. त्यामुळेच अनेक दिवस कॅम्प्स कॉर्नर भागातील वाहतूक विस्कळित झाली होती. त्यानंतर काही प्रमाणात डागडुजी करून याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यात आली. पण दरडप्रवण तसेच डोंगराळ भागात अद्यापही काम पू्र्ण झालेले नाही. याठिकाणी अद्यापही संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी घडलेल्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालिकेनेही वर्षभरात मोठ्या प्रमाणात येथे काम केले आहे. तसेच वाहून गेलेल्या रस्त्याच्या ठिकाणीही भराव घालण्यात आलेला आहे; परंतु येथे रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने २१ झाडांचा बळी जाणार असल्याचे कळते.
आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केम्प्स कॉर्नर येथील कामाचा आढावा घेत येथे किती वृक्ष तोडावे लागतील अशी विचारणा केली. तसेच यापैकी किती झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे? असाही प्रश्न त्यांनी केला. मॉन्सून कालावधीतही या प्रकल्पासाठी विशेष परवानगी मिळवून हा रस्ता सुरू करण्याचा मानस आदित्य ठाकरे यांनी या वेळी बोलून दाखवला. या रस्त्याच्या कामासाठी पालिका आयुक्तांशी बोलून विशेष प्रकल्प म्हणून परवानगी मिळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86056 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..