दोन वर्षानंतर स्कूल व्हॅन पुन्हा मार्गावर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षानंतर स्कूल व्हॅन पुन्हा मार्गावर!
दोन वर्षानंतर स्कूल व्हॅन पुन्हा मार्गावर!

दोन वर्षानंतर स्कूल व्हॅन पुन्हा मार्गावर!

sakal_logo
By

वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता. १८ : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने जवळपास दोन वर्षे स्कूल व्हॅन बंद होत्या; मात्र गेल्या काही दिवसांपासून शाळा पुन्हा सुरू झाल्याने स्कूल व्हॅनसुद्धा मार्गावर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाहकांची आर्थिक घडी पुन्हा बसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेकडो कुटुंबांना पुन्हा एक प्रकारची उभारी मिळणार आहे.

पनवेलचे रस्ते अरुंद असल्याने येथे स्कूल बसऐवजी स्कूल व्हॅनमधून सर्वाधिक विद्यार्थी शाळेत जातात. त्यामुळे शाळा आणि स्कूल व्हॅन एक समीकरण निर्माण झाले होते. पनवेल विद्यार्थी वाहक संस्था गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. यामध्ये सुमारे ३०० स्कूल व्हॅन चालक सदस्य आहेत. आदर्श विद्यार्थी वाहतूक करण्याचे काम या संस्थेच्या सदस्यांकडून केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता अबाधित राहून पालकांची चिंता दूर झाली आहे. विद्यार्थ्यांची घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेतून येईपर्यंत प्रवास सुखकर आणि काळजीपूर्वक व्हावा, या दृष्टिकोनातून विद्यार्थी वाहकांकडून खबरदारी घेतली जाते.

स्कूल व्हॅन आणि विद्यार्थी यांच्यातील अतूट नाते एक प्रकारे निर्माण झाले होते, परंतु मध्यंतरीच्या काळात कोरोना वैश्विक संकट आल्याने दोन वर्षे शाळा बंद होत्या. ऑनलाईन क्लास सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत नव्हते. त्यामुळे स्कूल व्हॅन पूर्णपणे बंद आणि लॉक झाल्या होत्या, परंतु कोरोनाची लाट ओसरली आणि ऑफलाईन शाळा सुरू झाल्या. आता पूर्ण क्षमतेने शाळेची घंटा वाजल्याने सर्व विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात जाऊन ज्ञानार्जन करीत आहेत. त्यामुळे पनवेल परिसरातील शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी स्कूल व्हॅनने जाऊ लागले आहेत.

स्कूल व्हॅन काका आणि विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध
पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणापर्यंत स्कूल व्हॅनमधून शाळेत आणि शाळेतून घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्कूल व्हॅन काकांशी एक वेगळे ऋणानुबंध जोडले जातात. दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने स्कूल व्हॅन आणि काकांशी संपर्क नव्हता, परंतु पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे स्कूल व्हॅन चालक काकांशी असलेले ऋणानुबंध पुन्हा वृद्धिंगत होण्यास सुरुवात झाली आहे.

कोट
कोरोनामुळे विद्यार्थी वाहतूक करणारे स्कूल व्हॅन चालक प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले; मात्र आता शाळा सुरू झाली, ही आमच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट आहे.
- पांडुरंग हुमणे, अध्यक्ष,
पनवेल विद्यार्थी वाहक संस्था

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86100 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top