
व्यवसाय करत ओमने मिळवले यश
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अंडा भुर्जीच्या धंद्यात आई-वडिलांना मदत करत अभ्यास करून डोंबिवलीतील ओम वायंगणकर याने दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण प्राप्त करत यश मिळवले आहे. कोरोनाच्या काळातदेखील पोटापाण्यासाठी घराबाहेर पडत रुग्णांना जेवणाचे डबे दिले आहेत. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल होताच हातात चहाची किटली घेऊन रस्त्यावर फिरून चहाही विकला.
ओमला कॅटरिंगच्या व्यवसायात आवड असून आई-वडिलांनी उभ्या केलेल्या या छोट्या व्यवसायाला पुढे मोठे स्वरूप देण्याचे ओमचे स्वप्न आहे. डोंबिवली पूर्वेला ओम हा राहावयास असून स्टेशन परिसरात त्याचे वडील संजीव यांची अंडा भुर्जीची गाडी आहे. आई-वडील दोघेही सकाळच्या वेळी गाडीवर व्यवसाय करतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सकाळच्या वेळेस ओमदेखील त्यांना मदत करतो. घरोघरी ऑर्डर घेऊन जाण्याचे त्याचे काम. कधी वडील नसतील तर तव्यावर अंडा भुर्जी, अंडा राईस बनवताना त्याचे हात तेवढ्याच सफाईने फिरतात. सहावी, सातवीला असल्यापासूनच तो शिक्षण घेता घेता आई-वडिलांना व्यवसायात मदत करत आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते, त्या वेळी कधी कधी तर त्याला ऑर्डर द्यायची असल्याने क्लासदेखील करता येत नव्हता. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर शाळा सुरू झाल्या. या वेळी अनेकदा शाळा बुडाली आहे; मात्र सायंकाळी वेळ काढून मी अभ्यास करत होतो असे ओम सांगतो. हलाखीच्या परिस्थितीत काम करून जिद्दीने दहावीच्या परीक्षेत ओमने यश मिळवले, त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कॅटरिंग व्यवसायात उतरणार
दहावीला ७० टक्के गुण मिळाल्याने मी आनंदी आहे. पुढे जाऊन कॅटरिंगचा व्यवसाय करायचा असून त्यादृष्टीने शिक्षण घेण्याचा विचार असल्याचे त्याने सांगितले. आई-वडिलांच्या या छोट्याशा व्यवसायाला मोठे स्वरूप मला द्यायचे असून, एक वेगळी ओळख या व्यवसायात निर्माण करण्याचे माझे स्वप्न असल्याचे ओम सांगतो.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86103 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..