
राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्र्याच्या नावाने फसवणूक
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : राज्याचे गृह (शहर) व गृहनिर्माण मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या जवळचा नातेवाईक असल्याचे भासवून एका भामट्याने पुण्यातील एका महिला उद्योजिकेला मंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून तब्बल १० लाख पाच हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विनायक शंकरराव रामुगडे असे भामट्याचे नाव असून त्याने विनायक पाटील हे नाव धारण करून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कामोठे पोलिसांनी या भामट्यासह दोघाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. सुजाता राकेश चंद्र, असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पुण्यात राहावयास असून त्यांना त्यांच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी आर्थिक निधीची आवश्यकता होती. मार्चमध्ये कामोठेतील अशोक जाधव यांच्या माध्यमातून विनायक शंकरराव पाटील याची ओळख झाली होती. विनायक पाटील हा गुंतवणूकदार मिळवून देण्याचे काम करत असल्याने सुजाता पाटील यांनी विनायक पाटील यांची कामोठे येथे भेट घेतली होती. त्या वेळी भामट्या विनायक पाटील याने त्याचे राज्यातील गृह (शहरे) व गृहनिर्माण मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याशी घरचे संबंध असल्याचे व मंत्री सतेज पाटील यांच्याकडून त्यांच्या कंपनीस पाच कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86176 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..