
कौसा रुग्णालयाचेही होणार आऊटसोर्सिंग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे महापालिकेने अनेक रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी कौसा रुग्णालयाचेही आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खासगी संस्थेच्या माध्यमातूनच सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा नागरिकांना देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे या रुग्णालयावर येणारा ताण कमी करण्यासाठी एकीकडे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे; तर दुसरीकडे पालिकेच्या रुग्णालयातील सेवा आऊटसोर्सिंगद्वारे देण्याचा निर्णय आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. यासाठी कौसा रुग्णालयाचेही आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयाची सर्व इमारतच खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. केवळ पाण्याचे बिल महापालिकेच्या वतीने अदा करण्यात येणार असून, बाकी सर्व यंत्रणा संबंधित खासगी संस्थेला उभारावी लागणार आहे. या ठिकाणी केवळ बाह्यरुग्ण विभाग आणि प्रसूती सुरू असून जेव्हा खासगी संस्था रुग्णालय चालवायला घेईल, त्या दिवसापासून मेडिकल सेवा, डायलिसिस सेंटर, चार ऑपरेशन थिएटर, ६ बेडचा लहान मुलांचा विभाग, १९ बेडचा माता आणि मुलांचा विभाग, अतिदक्षता विभाग आणि इतर सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. विशेषकरून मुंब्रा, दिवा, शीळ, डायघर आणि नवी मुंबईच्या नागरिकांना या रुग्णालयाचा फायदा होणार आहे.
रुग्णांवर मोफत उपचार
केंद्राची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत ‘नो कॅश काऊंटर’ पद्धतीनुसार रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यामध्ये संबंधित संस्थेला या योजनांमधून लाभार्थ्यांच्या मागे मिळणारा मोबदला हा संस्थेला मिळणार आहे; तर दुसरीकडे पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच सर्व प्रकारच्या सेवा दिल्याने महापालिकेचा ताण यामुळे कमी होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दिघे हार्टकेअर सेंटरला रुग्णांचा प्रतिसाद
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात धर्मवीर आनंद दिघे हार्टकेअर सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरला रुग्णांचा प्रतिसाद मिळत असून गोरगरीब कुटुंबांतील नागरिकांना हे सेंटर वरदान ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर कौसा रुग्णलयाचेही आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86204 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..