कुर्ला-सीएसएमटीची पाचवी-सहावी मार्गिका रखडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्ला-सीएसएमटीची पाचवी-सहावी मार्गिका रखडली
कुर्ला-सीएसएमटीची पाचवी-सहावी मार्गिका रखडली

कुर्ला-सीएसएमटीची पाचवी-सहावी मार्गिका रखडली

sakal_logo
By

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकलला गती देण्यासाठी विविध धोरणे आखली. त्यात मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कुर्लादरम्यानच्या पाचवी- सहावी मार्गिका २०२१ पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात केंद्राच्या संथ कारभारामुळे हा मार्ग १२ वर्षांपासून रखडला आहे. या मार्गिकेसाठी अद्याप भूसंपादनही झाले नसताना प्रकल्पाचा खर्च मात्र भरमसाट वाढला आहे. त्यामुळे केंद्राला या मार्गिकेचा विसर पडल्याचे दिसते.

उपनगरी रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी सीएसएमटी ते कुर्लापर्यंत पाचवी-सहावी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. २००८-०९ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ११५ कोटी रुपये होता; मात्र अनेक वर्षांपासून भूसंपादनाच्या अडचणीमुळे प्रकल्प खोळंबला आहे. केंद्रात मोदी; तर राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर या पाचवी-सहावी मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्याचा निर्णय घेतला. परळ रेल्वे स्थानकाबाहेर पंतप्रधान मोदींचा फोटो, मार्गिकेची रूपरेषा, अंदाजित खर्च आणि प्रकल्प पूर्ण करण्याची तारीख जाहीर केली; मात्र वर्ष उलटून गेले तरी हे काम अद्याप पूर्णत्वास आलेले नाही.

भूसंपादन रखडले
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एक हजार ६०.९९ चौरस मीटर जमिनीच्या भूसंपादनाचे काम रखडले आहे. कुर्ला ते सीएसएमटी पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी २,६५६ चौरस मीटर जमीन लागेल. गिरण्यांच्या जमिनीच्या संपादनासाठी रेल्वेने एनटीसीला नुकतेच १२१ कोटी रुपये दिले. कुर्ला ते परळपर्यंत लागून असलेल्या गिरण्यांच्या जागांचा यात समावेश आहे. उर्वरित जागांच्या भूसंपादनासाठी रेल्वे बोर्ड प्रयत्न करत आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

असा होईल फायदा
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्लादरम्यान पाचवी, सहावी मार्गिका स्वतंत्र नाही. त्यामुळे जलद लोकलच्या उपलब्ध दोन मार्गिकांवरूनच मेल, एक्स्प्रेस धावतात. लोकल सेवा यामुळे विस्कळित होते. त्यामुळे स्वतंत्र मार्गिका सुरू करण्याचे धोरण आखले गेले आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास लोकलचा वेग वाढेल.

उपनगरीय लोकलच्या फेऱ्या, क्षमता वाढवण्याची आमची मागणी होती; मात्र गेल्या १२ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही. मुंबईकरांचे यात हाल होत आहेत.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

कुर्ला-सीएसएमटीदरम्यानचे पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. कुर्ला-परळ आणि परळ-सीएसएमटी अशा दोन टप्प्यांत हे काम होईल. कुर्ला-परळदरम्यान काम सुरू झाले आहे. भूसंपादित करायच्या असलेल्या १०,०६१ चौरस मीटर जमिनीपैकी २,६५६ चौरस मीटर एनटीसी जमिनीला मंजुरी मिळाली असून ती रेल्वेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहे. उर्वरित भूसंपादन विविध टप्प्यांवर असून डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाची योजना आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

प्रकल्पावर आतापर्यंत झालेला खर्च
वर्ष - खर्च
- २०२०-२१ - १९१ कोटी १० लाख
- २०२१-२२ - १६७ कोटी ९६ लाख

अशी होती मार्गिकेची रूपरेषा
- कुर्ला ते परळ पाचवी-सहावी मार्गिका
- प्रकल्पाचा अवधी- मार्च २०२०
- परळ ते सीएसएमटी पाचवी-सहावी मार्गिका
- प्रकल्पाचा अवधी- मार्च २०२१
- पाचवी-सहावी मार्गिकेचे अंतर सुमारे १७. ६० किलोमीटर
- परळ येथे उपनगरीय टर्मिनस
- सायन येथे आरओबी पुनर्बांधणी
- माटुंगा, धारावी आणि किंग सर्कल रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्बांधणी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86253 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top