
अग्निपथ योजने विरोधात आंदोलन
डोंबिवली ः अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विरोध केला असून कृषी कायद्याप्रमाणे ही योजना रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. रविवारी राष्ट्रवादीचे कल्याण-डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत डोंबिवलीत अग्निपथ योजना आणि मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या वेळी कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड, युवक अध्यक्ष प्रसाद गायकवाड, वैभव मोरे, विधानसभा अध्यक्ष नयना भणगे, विधानसभा सचिव सारिका उदमले यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी कल्याण-डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी म्हणाले, या योजनेतून २५ टक्के सैन्य भरती केली जाणार आहे; मात्र उर्वरित ७५ टक्के तरुणांचे काय. ते बेरोजगारच होणार ना? असा सवाल उपस्थित करत राज यांनी या उर्वरित ७५ टक्के तरुणांना केंद्र सरकारने सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी केली.
उल्हासनगरात डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशनची रॅली
उल्हासनगर ः अग्निपथ योजनेच्या विरोधात डीवायएफआय (डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया) कल्याण तालुका कमिटीच्या वतीने उल्हासनगरात रॅली काढून ही योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात शेकडो पालक, विद्यार्थी सहभागी झाले होते. डेमोक्रेटिक यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय कमिटी सदस्य प्रीती शेखर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महेंद्र उघडे, तालुका अध्यक्ष ज्योती तायडे, सचिव रामेश्वर शेरे आणि साठी रवी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली लालचक्की ते रेल्वे स्थानक परिसरातून काढण्यात आली. दरम्यान, अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली असून गाड्या पेटवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उल्हासनगर रेल्वे स्थानकावर लोहमार्गाचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, सहायक पोलिस आयुक्त देविदास सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86262 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..