
देशी पिस्टल, पाच जिवंत काडतुसांसह एकाला अटक
भिवंडी, ता. १९ (बातमीदार) ः भिवंडीत येत्या काही महिन्यांत महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील भिवंडी एसटी स्टँड परिसरात एक इसम शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ आपल्या पथकासह तेथे सापळा रचून देशी पिस्तूलसह पाच काडतुसे बाळगलेल्या एक व्यक्तीस ताब्यात घेऊन अटक केली आहे. आकाश सुरेश हजारे (वय २४, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आगामी निवडणूक लक्षात घेऊन अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश पोलिस आयुक्त जगजित सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून भिवंडी गुन्हे शाखेच्यावतीने पोलिसांची विविध पथके बनवून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, रविवारी दुपारी एक इसम शस्त्रासह भिवंडी शहरातील एसटी स्टँड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यामुळे त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक धनराज केदार, पोलिस हवालदार सुनील साळुंखे, पोलिस नाईक साबीर शेख या पथकासह त्या ठिकाणी सापळा रचून संशयित इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानंतर आरोपीविरोधात निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धनराज केदार करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86274 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..