
ठाणेकरांनो काळजी घ्या
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : मागील दोन ते अडीच वर्षांपासून कोरोना या आजाराने थैमान घातल्यानंतर काही महिन्यांपासून कोरोनाने विश्रांती घेतली होती. त्यात मागील १५ दिवसांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. अशातच दुसरीकडे पावसाळ्याच्या काळात साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. असे असले तरी दुसरीकडे मलेरिया, डेंगी आणि चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात कोरोनापाठोपाठ साथीचे आजारदेखील डोकावू पाहत असल्याचे दिसून येत आहे.
आधीच कोरोनासारख्या महामारीच्या आजाराने ठाणेकरांना वेठीस धरले असताना, पावसाळा सुरू होत असल्याने साथ रोगाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. अशातच सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवलेल्या किंवा साचलेल्या पाण्यात धुणी-भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घराच्या आसपास पडलेल्या नारळाच्या करवंट्या, वाहनांचे टायर्स आदींमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन वापरावे, इमारतीमधील व घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत, साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. असे असताना, दुसरीकडे मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मलेरियाचे ४८७ रुग्ण आढळले होते; तर डेंगीच्या २० रुग्णांचे निदान झाले होते; तर २९२ संशयित रुग्णांचा समावेश होता; तर चिकनगुनियाचे तीन रुग्ण आढळले होते. आता मागील सहा महिन्यांचा विचार केल्यास महापालिका हद्दीत मलेरियाचे १२०, डेंगीचे चार आणि संशयित १९ तसेच चिकनगुनियाचे ३५ संशयित रुग्ण आढळले आहेत.
----
डासांचे प्रमाण वाढण्याची शक्यता
पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने आता धूरफवारणी आणि औषधफवारणी करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय ३० आरोग्य केंद्र आणि सहा प्रसूतिगृहांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पालिकेचे पथक आता ठाणेकरांची काळजी घेणार आहे.
...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरिया, डेंगी आदी आजारांच्या रुग्णांची संख्या सध्या कमी आहे; मात्र पावसाळ्यात ठाणेकरांना महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
- भीमराव जाधव, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86356 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..