
पालघरमध्ये जोरदार पाऊस
‘पालघर/ मनोर/ विक्रमगड/ बोर्डी, ता. २० (बातमीदार) ः पालघरमध्ये सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. पहिला पाऊस असल्याने कुठेही रस्त्यावर पाणी फारसे साचले नाही; मात्र पावसाची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी मात्र सुखावला आहे. शेतकऱ्यांनी हातपेरणी सुरू केली असून आतापर्यंत १४ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. पालघरमध्ये पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी ४ नंतर पाऊस थांबला असला तरी रिपरिप चालूच आहे. सकाळी ८ पर्यंत २३.०६ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे.
शेतकरी सुखावला
मोसमी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी आनंदित आहे. पालघर तालुक्यात १५ हजार २१९ हेक्टर भाताची लागवड होणार आहे. आतापर्यंत १४ टक्के भातपेरणी झालेली आहे. येत्या काही दिवसांत पेरणी पूर्ण होईल. भातशेतीसाठी सध्या तरी पाऊस समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
बोर्डी परिसरात पाणीच पाणी
बोर्डी परिसरात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे येथे सर्वत्र पाणीच पाणी झाले. रविवारी रात्री तसेच सोमवारी पहाटेपासून या भागात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रात्रभरात ८२ मि.मी. पाऊस झाला. सोमवारी सकाळी पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या. ११.३० वाजण्याच्या सुमारास ढगांचा प्रचंड गडगडाट झाल्यानंतर ढगफुटीसदृश पावसाला सुरुवात झाली असून पावसाचा जोर कायम आहे.
बंधारा फोडल्याने पुराचा धोका टळला
अस्वाली नदीवर वहिंद्रा पुलाखाली बांधलेला बंधारा तोडल्याने पुराचा धोका टळला आहे. हा बंधारा तोडण्यासाठी मजुरांना प्रचंड कष्ट करावे लागले. १० वाजता सुरुवात केल्यानंतर १ वाजेपर्यंत १६ पैकी सात गाळ्यांतील बांधकाम तोडण्यात कामगार यशस्वी झाल्यामुळे पुराचा धोका टळला. दरम्यान, उच्च दाबाच्या वीज वाहिनीत बिघाड झाल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सतत विजा चमकत असल्यामुळे खांबावर चढणे, वीज वाहिन्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणे इत्यादी कामे करताना व्यत्यय येत होता. वीज वितरण बोर्डी उपकेंद्राचे उपअभियंता मदन पदमिरे जातीने लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लक्ष देत होते.
मच्छिमारांची तारांबळ
मागच्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन झाईच्या बंदरात नांगरून ठेवलेल्या नौका सुरक्षित करण्यासाठी मच्छीमारांची तारांबळ उडाली. मागच्या वर्षी झाई बंदरातून सुमारे सात नौका पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी सोमवारी सकाळपासूनच बंदरावर कामाला सुरुवात केली होती.
मनोर परिसरात वातावरणात गारवा
मनोर परिसरात सोमवारी सकाळपासून ढगांच्या गडगडाटात दमदार पाऊस सुरू झाला. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मनोर मंडल क्षेत्रात २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी या पावसामुळे सुखावला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी नांगरणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पावसामुळे वीजवाहिन्यांमध्ये बिघाड निर्माण होऊन विजेचा लपंडाव सुरू होता.
बळिराजा भात पेरणीत व्यस्त
विक्रमगड तालुक्यात भात शेतीच्या कामांना अंतिम वेग आला आहे. बळिराजा शेतीच्या कामात व्यग्र दिसत आहे. खरीप नियोजनाची कामे जवळपास पूर्णत्वास आली आहेत. या वर्षी पावसाळा लवकर सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता; मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. विक्रमगड तालुक्यात ९२ गावे व अनेक पाडे असून ८५८५ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. येथील झिनी, सुरती, गुजरात- ११, गुजरात- ४, रत्ना, जया, सुवर्णा, कर्जत, मसुरी या भाताच्या वाणांची पेरणी होते. येथील गावठी भाताचे वान सर्वत्र प्रसिद्ध असून त्याची मागणीही मोठी आहे. दरम्यान, दोनतीन दिवस पाऊस असाच राहिल्यास १० दिवसांत पेरणीची कामे पूर्ण होतील, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86363 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..