
उपोषणास बसलेल्या शिक्षिकेची तब्येत बिघडली
पालघर, ता. २० (बातमीदार) ः नालासोपारा येथील यमुना गोविंद शिक्षण संस्थेचे नूतन विद्यालय या प्राथमिक विनाअनुदानित शाळेत १० वर्षे सेवा केलेले १७ शिक्षक जिल्हा परिषद कार्यालयाजवळ उपोषणास बसले आहेत. त्यातील एका शिक्षिकेची तब्येत आज गंभीर झाल्याने पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील शिक्षकांची परिस्थिती गंभीर असूनही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने शिक्षक संताप व्यक्त करीत आहेत. जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षकांना संचमान्यता व वैयक्तिक मान्यता देण्यास टाळाटाळ करीत असल्याने हे शिक्षक २ जूनपासून उपोषणाला बसले होते. त्यानंतर ६ जून रोजी खासदार राजेंद्र गावित यांनी उपोषणास बसलेल्या शिक्षकांची भेट घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत संचमान्यता व वैयक्तिक शिक्षक मान्यता देण्याचे ठरवण्यात आले होते व तसे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांना दिले होते. ही प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करावी असे ठरवले होते. त्यानुसार या शिक्षकांनी उपोषण स्थगित केले; मात्र एक महिना होऊनही बैठकीत ठरल्याप्रमाणे आश्वासनांची पूर्तता केली नाही म्हणून भरपावसात आम्हाला उपोषणास पुन्हा बसावे लागत आहे, असे या शिक्षकांकडून सांगण्यात आले. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी ज्येष्ठ शिक्षिका राऊत यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पोलिसांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86402 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..