
पावसाळ्यातही विकासकामे सुरूच
वाशी, ता. २१ (बातमीदार) : महापालिका आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना शहरात सुरू असणारी सर्व खोदकामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला पायदळी तुडवल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा सुरू झाला तरी शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची खोदकामे सुरूच असल्याने नवी मुंबईकर नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अनेक कामांची मुदत संपली असताना देखील कंत्राटदाराकडून संथगतीने सुरू ठेऊन रेटा ओढला जात आहे. त्यामुळे ही विकासकामे आहेत की, खोदकामे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून २४ तास पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेण्यात आल्याने ठाणे-बेलापूर मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी पाईपलाईन टाकल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यावर मातीचा भराव टाकून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीत दुचाकीने प्रवास करणाऱ्या चालकांना खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. तुर्भे नाका ते तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुलाच्या कामासाठी पावसाळ्यात पदपथ खोदण्याचे काम सुरू आहे. तर याच मार्गावर बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर महावितरणकडून केबल आणि पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले आहे. ऐरोली, कोपरखैरणे या ठिकाणी अंतर्गत रस्त्यावर मलनि:सारण वाहिन्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या ठिकाणी खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा विसर पालिकेला पडला आहे.
सानपाडा, तुर्भे, बेलापूर या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असून त्याच मार्गालगत पालिकेकडूनही खोदकाम करण्यात आल्याने दुहेरी त्रास वाहनचालक आणि सर्व सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. महापालिकेच्या माध्यमातून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध कामे सुरु करण्यात आल्याने खोदकामाबरोबरच मातीचा थर रस्त्यावर पसरल्याने अपघाताची शक्यता आहे.
गॅरेजमुळे नाहक त्रास
ठाणे-बेलापूर मार्ग, बोनकोडे-सानपाडा पामबीच मार्गावर मागील काही वर्षांपासून विनापरवाना गॅरेज दुकाने थाटली आहेत. या दुकानदारांनी एनएमएमटीचे बसथांबे देखील गिळंकृत केले आहेत. वाहनांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे केमिकल हे रस्त्यावर साचलेल्या पावसाळ्याच्या पाण्यात मिश्रित होते. त्यामुळे या व्यावसायिकांवर ठाणे महापालिकेप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
उड्डाणपूल, रस्त्याच्या कडेला माती
शहरातील जोड रस्ते, उड्डाणपूल, मुख्य महामार्ग या ठिकाणी रस्त्याच्याकडेला मातीचे थर साचले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने मुकुंद, साठेनगर, रबाळे नाका, तुर्भे नाका, शिरवणे उड्डाणपूल, सानपाडा उड्डाणपूल, नोसिल नाका, कोपरी गाव ते वाशी पामबीच जोड मार्ग, दिवाळे गाव सर्कल, आरटीओ रोड या ठिकाणी प्रवास करताना वाहनचालकांना वाहतूक कोंडी बरोबरच अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86431 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..