
कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदेशीर पोस्टर्स विरोधात पालिका प्रशासन आक्रमक .....
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहरात बेकायदा होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंडे लावल्याने शहर बकाल झाले होते. बेकायदा पोस्टर्सविरोधात पालिका प्रशासन आक्रमक झाले असून कायापालट अभियानांतर्गत मागील दोन वर्षांत विविध प्रभागांत सुमारे १९,७४८ होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंडे काढण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत १० प्रभाग क्षेत्र कार्यालये असून शहरात बेकायदा होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंडे लावल्याने शहर विद्रूप दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका, मंत्रालय ते न्यायालयात दाद मागितली होती. याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कारवाईचे आदेश दिले होते. १० प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्तांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मागील दोन वर्षांत कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेची कारवाई
अ प्रभाग ४४८
ब प्रभाग ८२८४
क प्रभाग २४७८
जे प्रभाग ७२३
ड प्रभाग ३४१२
फ प्रभाग १२६४
ह प्रभाग १७३१
ग प्रभाग १११
आय प्रभाग २६१
ई प्रभाग १०३६
एकूण १९,७४८
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86435 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..