
आदिवासी प्लॉटवरील सर्वेक्षण थांबवण्यासाठी मोर्चा आदिवासी प्लॉटवरील सर्वेक्षण थांबवण्यासाठी मोर्चा
डहाणू, ता.२१ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील जंगलपट्टी भागातील काही गावात वनविभागाचे कर्मचारी आदिवासींना देण्यात आलेल्या प्लॉटवरील झाडांचे सर्वेक्षण करून, तेथील झाडांची मोजणी करत आहेत. आपण वाढविलेली झाडे भविष्यात कापण्यात आली तर, त्यावर प्लॉटधारक व ग्रामसभेचा अधिकार राहावा. अन्यथा सर्वेक्षणाचे काम बंद करण्यात यावे. तसेच सामुहिक वन संसाधन क्षेत्राचे नकाशे आणि समितीने प्रस्तावित केलेल्या जीपीएस लोकेशनची माहिती त्वरित पुरविण्यात यावी, या मागणीसाठी कष्टकरी संघटनेने मोर्चा काढला.
डहाणू कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष ब्रायन लोबो यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.२१) उपवन संरक्षण यांच्या कार्यालयावर डहाणू पारनाका येथून मोर्चा काढण्यात आला. त्यात हजारो आदिवासी स्त्री-पुरुष सामील झाले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने वन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. वनहक्क कायद्याखाली वाटप करण्यात आलेल्या वैयक्तिक प्लॉटचे सर्वेक्षण करून तेथील झाडांच्या मोजणीचे काम वनविभागाने सुरू केले आहे. ही झाडे कापून नेली जातील, अशी भीती आदिवासींच्या मनात आहे. ही झाडे प्लॉट धारकांनी वाढविलेली असल्याने, त्यावर हक्क प्लॉट धारकांचा आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यावर या झाडांवर प्लॉट धारकांचाच अधिकार आहे. वनविभाग कोणतेही झाड कापणार नाही. तसेच झाडांचे सर्वेक्षण बंद ठेवण्यात येईल. झाडांची मालकी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन करून ठरविण्यात येईल. त्याचप्रमाणे सामुहिक जंगलाच्या नियोजनासाठी सर्व माहिती २७ जून २०२२ पर्यंत पुरविण्यात येईल असे आश्वासन वन अधिकाऱ्यांनी दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86484 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..