
नवी मुंबईतील पाणीटंचाईवर उपाययोजना करा नवी मुंबईतील पाणीटंचाईवर उपाययोजना करा
वाशी, ता. २१ (बातमीदार) ः ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी (ता.२१) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबत बैठक घेतली. नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांवर या वेळी दोघांत चर्चा झाली. या वेळी शहरात सुरु असलेल्या पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नाईक यांनी केली. त्याचबरोबर अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. याकडे आयुक्तांचे लक्ष वेधून प्रलंबित शिष्यवृत्तीचे वाटप लवकरात लवकर करण्याची सूचना देखील केली. या वेळी माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, रवींद्र इथापे,अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, अन्य नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. अनेक भागात दूषित पाणी पाणीपुरवठा होतो आहे. मोरबे धरणाचे ४५० एमएलडी आणि बारवी धरणाचे ५० एमएलडी पाणी दररोज नवी मुंबईला मिळते. नवी मुंबईला हे पाणी पुरेसे आहे, मात्र एमआयडीसीकडून मिळणारे चाळीस एमएलडी पाणी इतर शहरांमध्ये वळवले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईत पाणीटंचाई सुरू आहे. हक्काचे पाणी नवी मुंबईला मिळेल हे सुनिश्चित करून आयुक्तांनी पाणीटंचाईग्रस्त भागात पाण्याचा दाब वाढवावा अशी सूचना आयुक्तांना नाईक यांनी केली. त्याचप्रमाणे, कोपरखैरणे विभागातील सुमारे एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज विविध कारणे सांगून अपात्र ठरविण्यात आले आहेत. यावर आमदार नाईक यांनी पालिका प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.
----
वाढत्या कोरोनारुग्णांच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात
नवी मुंबईमध्ये मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. शहरात अठराशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्हिटी रेट चार टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच उपाययोजना करण्याची सूचना आमदार नाईक यांनी केली. कोरोना टेस्टिंग आणि कोरोना लसीकरणाची संख्या वाढवावी. कोरोना सेंटर आणि रुग्णालयांमधून आवश्यक औषधे वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी यांची तरतूद करावी. कोरोनाची खबरदारी घेण्याविषयी जनतेमध्ये जनजागृती करावी.
--------
भुयारी मार्गात प्रखर दिवे बसवावेत
शहरातील बहुसंख्य भुयारी मार्गांमध्ये मंद प्रकाशाचे दिवे महापालिकेने बसवले आहेत. मंद प्रकाशात भुयारी मार्गातून वाहने चालवून धोकादायक आहे. नागरिकांसाठी हे मार्ग असुरक्षित बनले आहेत. त्यामुळे प्रखर प्रकाशाचे एलईडी दिवे भुयारी मार्गांमध्ये बसवावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली असता लवकरच त्यादृष्टीने सुरुवात करण्यात येईल असे आयुक्त बांगर म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86505 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..