
खंबाळपाडा येथे लवकरच अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : खंबाळपाडा येथे साडेचार एकरचा भूखंड असून तेथे एक स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला असून त्याचा डिपीआरदेखील तयार झाला आहे. याठिकाणी सिंथेटीक ट्रॅक, क्रिकेट, फुटबॉल, इनडोअर गेम असतील, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.
डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगर येथील उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने उपक्रमात सहभागी होत शुभेच्छा दिल्या. खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले, की खंबाळपाडा येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आणखी निधीची आवश्यकता लागल्यास तोदेखील उपलब्ध करून दिला जाईल. तसेच आनंदनगर उद्यान हे खूप जुने उद्यान आहे. २००९ साली पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर आता २०२२ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, लहान मुलांसाठी सेफ्टी मॅट अंथरून त्यावर विविध खेळ मांडलेले आहेत, जॉगिंग ट्रॅक येथे उभारण्यात आले आहेत. अद्ययावत उद्यान कसे असावे, याचे खूप चांगले उदाहरण दिपेश व जयेश यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून दिले आहे. इतर लोकप्रतिनिधींनी यांचा आदर्श घेतला पाहिजे. कल्याण डोंबिवलीत जिथे जिथे खुल्या जागा आहेत तिथे अशा प्रकारची उद्याने उभारली गेली पाहिजे, असे मत यावेळी खासदार शिंदे यांनी व्यक्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86546 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..