
ठाणे पालिकेची निवडणूक घटीका समिप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ ः तीन महिन्यांपासून लांबलेल्या ठाणे पालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण सोडत काढल्यानंतर आता गुरुवारी (ता. २३) प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. यानंतर १ जुलैपर्यंत त्यावर हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे.
ठाणे पालिकेची मुदत मार्चमध्ये संपली असून सध्या प्रशासकाकडून संपूर्ण कारभार सुरू आहे. सहा महिन्यांपुढे प्रशासक नेमणे अयोग्य असल्याचे कारण देत न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार टप्प्याटप्प्याने निवडणूक कार्यक्रम राबवला जात असून ठाणे पालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २३ जूनला प्रसिद्ध होणार आहेत. तसेच २३ जून ते १ जुलै या कालावधीत हरकती व सूचना मागवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी दिली.
नागरिकांना प्रभागांच्या मतदार यादीवरील हरकती व सूचना या सहायक पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त (संबंधित प्रभाग) यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपातच दाखल करता येणार आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या निवडणूक विभाग (मुख्यालय) आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या मतदार याद्या आगाऊ मागणी नोंदवल्यास नागरी सुविधा केंद्र, महापालिका मुख्यालय येथे विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील.
विधानसभेच्या मतदार याद्यांचे विभाजन
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली व ३१ मेपर्यंत अद्ययावत केलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. तसेच विधानसभा क्र. १४४ कल्याण ग्रामीण, १४६- ओवळा-माजिवडा, १४७- कोपरी पाचपाखाडी, १४८- ठाणे व १४९- मुंब्रा-कळवा या विधानसभेच्या मतदार याद्यांचे पालिकेच्या प्रभागनिहाय विभाजन करण्यात आले आहे. या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86623 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..