
सेवा रस्ता पुन्हा खड्ड्यात
नवीन पनवेल, ता. ३० (वार्ताहर) : कळंबोली सर्कल ते तळोजा लिंकदरम्यान मार्बल मार्केटलगत सेवा रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. कळंबोलीमधील बहुतांशी लोक सायन-पनवेल महामार्गाला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात; परंतु खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकीरीचे झाले आहे.
कळंबोली सर्कल ते तळोजा लिंक रोड यादरम्यान सिडकोने सेवा रस्ता गेल्या वर्षी तयार केला. सहा कोटी रुपये खर्च करून हे काम पूर्ण करण्यात आले; परंतु संबंधित ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याने मार्बल मार्केट परिसरात रस्ताच शिल्लक राहिला नाही. मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. महिनाभरापूर्वी या रस्त्याची सिडकोकडून डागडुजी करण्यात आली होती; परंतु निकृष्ट काम केल्यामुळे या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच बाजूला पेट्रोल पंप असल्याने येथे दररोज हजारो वाहने डिझेल आणि पेट्रोल भरण्याकरता येतात. विशेषकरून चारचाकी आणि दुचाकी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर येतात. त्यांना खड्ड्यात वाट काढत पंप गाठावा लागतो. याशिवाय बाजूलाच सर्वात मोठे मार्बल मार्केट आहे. येथे देशभरातून ग्रॅनाईट लादी आणि मार्बल लोडिंग डाऊनलोडिंग करण्याकरता अवजड वाहने येतात; परंतु मार्केटमध्ये जाण्यासाठी खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे हेलकावे खात कसेबसे वाहनांना वाट काढावी लागते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86742 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..