
विजेच्या धक्क्याने कामगार जखमी
वाडा, ता. २४ (बातमीदार) ः तालुक्यातील मेट गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका कामगाराला विजेचा धक्का लागून जखमी झाल्याची घटना घडली आहे. या कामगारावर ऐरोली येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. ब्रिजेश सिंग (वय ५३) असे या कामगाराचे नाव आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात मेट येथे विद्युत खांबावरील विजेची तार पडून लोंबकळत होती. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ब्रिजेश सिंग हा कंपनीत कामाला चालला होता. यावेळी विजेची तार लोंबकळत असलेली त्याच्या लक्षात न आल्याने त्याला उच्च दाबाच्या तारेचा जोरदार धक्का लागून तो लांब फेकला गेला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या ब्रिजेशला प्रथम अंबाडी येथील जिजाऊ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची स्थिती गंभीर असल्याने त्याला पुढे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्या कामगाराला पुढील उपचारासाठी ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप येथील जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते कुणाल शिर्के यांनी केला असून कामगाराला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी विजेची उपकरणे कशी आहेत, हे महावितरणने बघून ती व्यवस्थित करून घेणे ही जबाबदारी कंपनीची असताना वर्षानुवर्षे उपकरणांच्या दुरुस्तीकडे महावितरण डोळेझाक करत असल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप शिर्के यांनी केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86771 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..