पुनर्विकासात विकसकाकडून बँक गॅरेंटी कशी मिळवावी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनर्विकासात विकसकाकडून बँक गॅरेंटी कशी मिळवावी?
पुनर्विकासात विकसकाकडून बँक गॅरेंटी कशी मिळवावी?

पुनर्विकासात विकसकाकडून बँक गॅरेंटी कशी मिळवावी?

sakal_logo
By

सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहकार कायदा उपविधी (बाय लॉ) संदर्भात वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे देणारे सदर...

पुनर्विकासात विकसकाकडून बँक गॅरंटी कशी मिळवावी?

प्रश्न : आमच्या संस्थेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. विकसकाने पुनर्विकास प्रकल्प निर्धारित वेळेत व अटी-शर्तींनुसार पूर्ण करावा, यासाठी बँक गॅरंटी द्यावी, असा आग्रह मी धरत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बँक गॅरंटी नको आहे, कारण विकसक बँक गॅरंटी देणार नाही, अशी स्थिती आहे. पण त्यामुळे प्रकल्प होणार नाही किंवा वेळ लागू शकतो. अशा स्थितीत आम्ही ही बँक गॅरंटी कशी मिळवावी?
- अशोक मंगरूळकर, चेंबूर

उत्तर : सहकारी संस्थेमध्ये पुनर्विकासात अनेक अनिश्‍चितता असतात. सर्व सभासद या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी प्रयत्न करतात. सभासदांची फसवणूक होऊ नये, यासाठी सरकारनेही अनेक नियम व अटी-शर्ती, मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार तुम्ही विकसकाकडून बँक गॅरंटीचा आग्रह धरत असून त्यात चुकीचे काही नाही. सहकारी संस्थांच्या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र सरकारने कायदा क्रमांक ७९ नुसार तीन जानेवारी २००९ व १४ जुलै २०१४ रोजी मार्गदर्शक परिपत्रके काढली आहेत. पुनर्विकास प्रक्रियेमध्ये दोन सल्लागार आवश्यक असतात. एक पीएमसी, म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन तज्ज्ञ व दुसरा कायदेविषयक सल्लागार. तुमच्या संस्थेमध्ये हे दोन सल्लागार संस्थेने सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन नियुक्त केले आहेत किंवा कसे, हे पाहावे लागेल. नसल्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ही नियुक्ती करण्याचा आग्रह धरावा. या दोन सल्लागारांमुळे संस्थेचा प्रकल्प योग्य दिशेने जाण्यास मदत होते. आपल्या संस्थेने कायदा क्रमांक ७९ नुसार विकसकाची नियुक्ती सर्वसाधारण सभेमध्ये केली आहे किंवा कसे हे कळत नाही. जर विकसकाची निवड सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच झाली असेल, तर आपण उपस्थित केलेले प्रश्न उद्भवणारच नाहीत. कारण संस्थेच्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये विकसकाने काय करावयाचे आहे, ते स्पष्ट केले असते. त्यात बँक गॅरंटी, इतर सुरक्षा उपाय यांची माहिती असते. कोणत्याही विकसकाची निवड कायद्यानुसार झाली नसल्यास पुनर्विकास प्रकल्पामध्ये अडचणी येऊ शकतात. सध्या सर्व प्रकल्प रेरा अन्वये नोंदणीकृत करावयाचे असल्याने विकसकाची संपूर्ण माहिती सार्वजनिक पटलावर उपलब्ध होते; परंतु हे सर्व विकसकाशी संस्थेने करार केल्यावर होते. त्यामुळे विकसकाची निवड व त्याला संस्थेच्या पीएमसीने तयार करून दिलेल्या टेंडर डॉक्युमेंटमधील अटी-शर्तींमध्ये संस्थेला आवश्यक असणाऱ्या बाबी अंतर्भूत असतात.

प्रश्न : भाग दाखल्यावर वडिलांचे नाव कमी करून आईचे, माझे व बहिणीचे नाव आणण्यासाठी बक्षीसपत्र, नामनिर्देशनपत्र असे कायदेशीर मार्ग वापरले आहेत; परंतु एक क्षुल्लक रक्कम देय नसताना दिली नाही व त्याबाबत स्पष्टीकरण विचारले म्हणून संस्था माझ्याशी संपूर्ण असहकार्य करीत आहे. याबाबत मी काय करावे, पोलिस-उपनिबंधक इत्यादी कायदेशीर मार्ग कसे वापरावेत?
- चेतन दिवेकर, माटुंगा

उत्तर : कोणत्याही सभासदाला असा त्रास होऊ नये, यासाठीच कायदे, नियम, तरतुदी करण्यात आले आहेत. काही पदाधिकाऱ्यांना सामाजिक बांधिलकी नाही, सहकार कायदे समजत नाहीत, अशा अयोग्य व्यक्तींच्या हातात संस्थेची सूत्रे गेल्यामुळे त्याचा त्रास सर्वसाधारण सभासदांना भोगावा लागत आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये वारसाहक्काने सदनिका- भाग दाखला बदलण्याचे अनेक नियम व तरतुदी आहेत. मुळात देणे नसलेल्या रकमेसाठी भाग दाखला बदलून देण्यास कागदोपत्री कोणतीही आडकाठी नाही. अशी अडचण कोणी पदाधिकारी करत असेल तर तो किंवा ती, हे कृत्य कायद्याविरुद्ध जाऊन करत आहे. सभासद म्हणून तुम्हाला उपलब्ध कायदामान्य व्यवस्थेचा वकिलांच्या सल्ल्याने योग्य वापर करून अयोग्य पदाधिकाऱ्यांना वठणीवर आणता येते. आपण कायद्याचे पालन करून कोणतेही प्रयत्न न सोडता कायदेशीर कार्यवाही चालू ठेवा, यश नक्की मिळेल. निबंधक कार्यालयाकडून नामनिर्देशनाच्या आधारे योग्य आदेश मिळवावेत. नामनिर्देशाच्या आधारे आपण प्रोव्हिजनल मेंबर बनू शकता व त्याआधारे संस्थेच्या सर्व कारभारामध्ये भाग घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण कायदेशीररीत्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या
मनमानी कारभाराला आळा घालण्याचे काम करू शकता. तरीही पदाधिकारी आडमुठेपणा करीत असल्यास पोलिस यंत्रणेमार्फत निबंधकांच्या आदेशाची अंमलबजावणी करता येते.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-मेलवर पाठवावेत - Sharadchandra.desai@yahoo.in

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86832 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top