
तिकीट तपासनीसांमुळे माय लेकरांची भेट
नवीन पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : रत्नागिरी ते पनवेलदरम्यान तिकीट तपासनिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांतच ताटातूट झालेल्या माय-लेकरांची भेट घडवून देण्यात आली. आपल्या मुलाला पाहताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
नागरकॉईल गांधीधाम रेल्वेने (क्र. १६३३६) दोन लहान मुले आणि त्यांची आई अलवा ते अहमदाबाद असा प्रवास करीत होते. सदर रेल्वेने चिपळूण रेल्वे स्थानक सोडले आणि गाडी पनवेलच्या दिशेने धावू लागली. या वेळी सदर गाडीमध्ये रत्नागिरी ते पनवेल असे तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत असलेले के. के. कापसे व प्रदीप शिर्के आपले काम करीत होते. त्यांना दोन लहान मुले गाडीत बसली असून ती रडत आहेत असे आढळून आले. त्यांनी मुलांकडे जाऊन त्यांची विचारपूस केली असता चिपळूण येथे गाडी थांबली तेव्हा खाऊ आणण्यासाठी मुलांची आई रेल्वेमधून उतरून फलाटावरील स्टॉलवर गेली, परंतु दरम्यान गाडीने चिपळूण सोडले आणि त्या मुलांची आई स्थानकावरच राहिली. या घटनेमुळे ती मुले भांबावून गेली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तिकीट तपासनीस कापसे यांनी रेल्वेच्या बेलापूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून चिपळूण स्टेशन मास्टर कार्यालयात कल्पना दिली. दरम्यान, त्यांनी मुलांना धीर देऊन गाडीत स्वतः आणि प्रवाशांच्या मदतीने त्या मुलांची खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. त्या मुलांना धीर देऊन त्यांची आई मागील रेल्वेने येत आहे आणि पुढल्या स्थानकावर तुम्हाला ती भेटेल, असे सांगून त्यांना शांत केले. दरम्यान, चिपळूण स्टेशन मास्टर यांनी त्या महिलेला मागून येणाऱ्या जनशताब्दी (गाडी क्र. १२०५२) या गाडीत बसवून दिल्याची माहिती कापसे यांना दिली.
कापसे आणि शिर्के यांनी याबाबत पनवेल आरपीएफला कळवून त्या बालकांना त्यांच्या स्वाधीन केले. काही तासांतच पाठोपाठ जनशताब्दी रेल्वेने आलेल्या महिलेच्या ताब्यात ती दोन्ही मुले स्वाधीन करण्यात आली. काही तासांकरिता ताटातूट झालेल्या माय-लेकरांची भेट तिकीट तपासनिसांच्या सतर्कतेमुळे घडवून आणल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86837 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..