पनवेल परिसरातील पावसाळी पर्यटन स्थळ विकसित करण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल परिसरातील पावसाळी पर्यटन स्थळ विकसित करण्याची गरज
पनवेल परिसरातील पावसाळी पर्यटन स्थळ विकसित करण्याची गरज

पनवेल परिसरातील पावसाळी पर्यटन स्थळ विकसित करण्याची गरज

sakal_logo
By

पावसाळी सहलीचे वेध
पनवेलमधील पर्यटनस्‍थळे विकासाच्या प्रतीक्षेत

दीपक घरत, पनवेल
पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत असला तरी ग्रामीण भागातील अजूनही निसर्ग सौंदर्याने नटला असून, पावसाळ्यात सौंदर्यात आणखीनच भर पडते. त्‍यामुळे पावसाळी सहलीसाठी अनेकांची पावले पनवेलच्या दिशेने वळतात. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू स्थानी खारघरमधील पांडवकडा धबधबा, कर्नाळा पक्षी अभयारण्य, मोर्बे धरण, गाडेश्वर धरण, माची प्रबळगड, कलावती दुर्ग ही स्थळे आहेत. मध्यंतरी झालेल्‍या काही दुर्घटनांमुळे यंदाही पर्यटनस्‍थळावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही काही पर्यटक आडवाटेने याठिकाणी पोचतात.
पर्यटन स्‍थळावर सरसकट बंदी घालण्याऐवजी परिसराचा विकास केल्‍यास, सुरक्षेच्या दृष्‍टीने उपाययोजना केल्‍यास महापालिकेच्या महसुलात वाढ होईल शिवाय स्‍थानिकांनाही रोजगार उपलब्‍ध होण्याची शक्‍यता आहे. त्‍या दृष्‍टीने प्रशासनाचे प्रयत्‍नही सुरू आहेत.

कर्नाळा पक्षी अभयारण्य
पनवेलपासून केवळ १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्याला पर्यटक नेहमीच पसंती देतात. शेकडो प्रजातीच्या वनस्पती आणि पशू-पक्षी आढळणाऱ्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पावसाळ्यात अनेक-लहान मोठे पाण्याचे ओढे तयार होत असल्याने पावसाळी सहलीसाठी पर्यटक आवर्जून भेट देतात.

पांडवकडा धबधबा
उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्‍यामुळे पावसाळ्यात पर्यटक हमखास हजेरी लावतात. याठिकाणी झालेल्‍या अपघातांमुळे धबधब्‍यावर जाण्यास बंदी असली तरी खारघर टेकडी तसेच लगतच्या परिसरातील ओढे, धबधब्‍यावर पर्यटक भेट देतात. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्‍या या परिसराचा पर्यटनस्‍थळ म्‍हणून विकास व्हावा यासाठी प्रस्‍ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनदरबारी प्रलंबित आहे.

मोर्बे धरण
तालुक्यातील खैरवाडी-गारमाळ परिसरात ५० एकर जागेवर बांधण्यात आलेल्या मोर्बे धरणाचे पाणी आजूबाजूच्या गावांना तसेच शेतीसाठी पुरवठा केले जाते. हिरवाईने नटलेला हा परिसर पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतो. पनवेलपासून केवळ १० किलोमीटर अंतरावर असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते.

गाढेश्वर धरण
पनवेल तालुक्यात असलेल्या धरणांपैकी गाढेश्वर धरण हे पाणीपुरवठ्याचे एक प्रमुख स्रोत असून एकूण जल साठ्यापैकी २० टक्के पाणी पनवेल शहरास पुरविण्यात येते. शहरापासून १६ कि.मी. अंतरावर असलेल्‍या धरण परिसरातील लहान मोठ्या ओढ्‌यावर अनेकजण पावसाळ्‌यात मौजमजा करण्यासाठी येतात.

माची प्रबळगड
पनवेलपासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या माची प्रबळ गडावर ट्रेकिंग करण्यासाठी येणाऱ्यांची वर्षभर गर्दी असते. मुंबई - पुणे महामार्गावरून दिसणाऱ्या प्रबळ गडाच्या परिसरात पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे तयार होत असल्याने पावसाळी सहलीसाठी गदी वाढू लागली आहे.

कलावंतीण दुर्ग
मुंबई-पुणे महामार्गावरून सहज दिसणाऱ्या या किल्‍ल्‍यावर ट्रेकर्स आवर्जून हजेरी लावतात. कोण्या एका राजाचे आपल्‍या कलावंती राणीवर खूप प्रेम होते. राणी आपल्याला सोडून जाऊ नये म्‍हणून राजाने कलावंतीसाठी या उंच किल्‍ल्यावर महल बांधला होता. हा दुर्ग प्रबळ गडालगतच आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायर्‌या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याला दुर्गावर आदिवासी नृत्‍य करतात. या दुर्गावरून माथेरान, चंदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड, कर्नाळा किल्ला व तसेच मुंबईचे सहज दर्शन होते.

स्थानिकांना रोजगार
निधीअभावी पर्यटनस्थळांचा विकासात बाधा येत असल्‍यास, परिसरातील ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊन पावसाचे चार महिने पर्यटकांची सुरक्षा करता येणे सहज शक्य असल्याचे मत निसर्ग मित्र संस्थेचे सचिन शिंदे यांनी व्यक्त केले आहे. या संस्थेतर्फे प्रबळ गडालगतच्या स्थानिकांना सुरक्षेचे धडे देण्यात आले असून, पर्यटकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच अपघातात सापडलेल्या पर्यटकांची सुटका करण्यासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे काही ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे. तर काही ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी खानावळ सुरू केली आहे.
......

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86844 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..