
बदलापुरात साधारण ६० हजार नवे मतदार
बदलापूर, ता. २५ : कुळगाव बदलापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. २०१५ च्या निवडणुकीत साधारण सव्वालाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदा मतदारांच्या आकडेवारीत साधारण ६० ते ६१ हजार मतदारांची भर पडली असून, यंदा एक लाख ८६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आजपासून १ जुलैपर्यंत यावर हरकती व सूचना घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
२०१५ रोजी कुबनपाच्या निवडणुकीत एकूण ४७ प्रभाग होते. या प्रभागांसाठी त्या वेळी एकूण सव्वा लाख लोकांनी मतदान केले. २०१५ नंतर २०२० मध्ये निवडणुका होणे अपेक्षित असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलण्यात आल्या. आता २०२२ ला या निवडणुका संदर्भातील घडामोडी घडू लागल्या आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असल्याने, मतदारांची संख्याही आपसूकच वाढली आहे. त्यात यंदा होणारी निवडणूक बदलापूरकरांसाठी नवीनच आहे. कारण पहिल्यांदाच बदलापूर शहरात द्विसदस्यीय प्रभागरचना करण्यात आली असून, त्यामुळे गेल्या वेळच्या ४७ प्रभागांत अजून दोन प्रभाग वाढल्यामुळे अशा एकूण ४९ प्रभागांचे २४ प्रभाग करण्यात आले आहेत. या २४ प्रभागांपैकी २३ प्रभाग हे द्विसदस्यीय असून प्रभाग क्रमांक ७ हा प्रभाग त्रिसदस्यीय पद्धतीचा असणार आहे. त्यामुळे या २४ प्रभागांसाठी यंदा एक लाख ८६ हजार ९६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांमध्ये ९८ हजार ५९५ इतके पुरुष असून ८७ हजार ४८५ ही स्त्री मतदारांची संख्या आहे; तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या बदलापूर शहरात १६ इतके आहे.
५ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध
आकडेवारीतून साधारण २४०२ नावे ही वगळण्यात आली असून, ती वगळता मतदारांची संख्या ही एक लाख ८४ हजार ९४ इतकी आहे. त्यात ही प्रारूप मतदार यादी असून, यावर १ जुलैपर्यंत हरकती घेऊन त्यावर ५ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86875 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..