
मुंबईकरांची लस घेण्याकडे धाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईसह राज्यात कोरोनाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. त्यामुळे लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या मुंबईकरांनी पुन्हा एकदा पूर्ण लसीकरण करून घेण्यासाठी धाव घेतली आहे. मे महिन्याच्या तुलनेत या जूनच्या पहिल्या २१ दिवसांत मुंबईतील लसीकरणाची आकडेवारी २४ टक्क्यांनी वाढली आहे, परंतु राज्याची लसीकरणाची आकडेवारी अद्यापही पिछाडीवर आहे.
पालिका अधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितले, की तिसऱ्या लाटेनंतर लसीकरणाच्या आकडेवारीत मोठी घट झाली होती. आम्ही नागरिकांना सतत दुसरा डोस आणि बुस्टर घेण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही पालकांना, त्यांच्या मुलांनाही लसीकरणासाठी आणण्यास सांगत आहोत, परंतु प्रतिसाद कमी होता, परंतु आता रुग्णवाढ झाल्याने लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. मे महिन्यात मुंबईत २,१२,४१३ लाभार्थ्यांनी लस घेतली; तर जून महिन्याच्या २१ पर्यंत २,६२,७२० नागरिकांनी लस घेतली; तर राज्यात मे महिन्यात १८,३५,४५९ लाभार्थ्यांनी लस घेतली; तर जूनच्या २१ पर्यंत १७,३२,६५९ इतक्याच नागरिकांनी लस घेतली. याचा अर्थ राज्याच्या लसीकरणात पाच टक्के घट झाली; मात्र राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की जून अखेरपर्यंत आम्ही मेच्या एकूण लसीकरणाचा आकडा पार करू.
पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे याबाबत म्हणाल्या, की नागरिकांना लसीचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी पालिका आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रुग्णसंख्या वाढत आहे आणि संसर्ग होण्याची शक्यताही जास्त आहे. म्हणून ज्यांनी अजून दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी ताबडतोब जवळच्या केंद्राला भेट द्यावी आणि जे बुस्टर डोससाठी पात्र आहेत, विशेषत: ज्येष्ठ नागरिक त्यांनी हा डोस घ्यावा.
लसीमुळे रुग्ण कमी
कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी लस अत्यंत फायदेशीर आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे कमी प्रमाण प्रामुख्याने लसीमुळे आहे. प्रत्येकाने लस घ्यावी, असे राज्य कोविड मृत्यू निरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
मुंबईची लसीकरणाची आकडेवारी
मे- २,१२,४१३
जून (ता. २१ पर्यंत)- २,६२,७२०
राज्याची लसीकरणाची आकडेवारी
मे- १८,३५,४५९
जून (ता. २१ पर्यंत)- १७,३२,६५९
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86885 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..