
ठाण्यात जलजन्य आजार डोकावतोय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ ः पावसाळ्याच्या काळात साथीच्या आजारांबरोबरच जलजन्य आजारदेखील आपले डोकेवर काढत असतात. अशावेळी आजार उद्भवू नये यासाठी ठाणे महापलिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. असे असले, तरी जानेवारी २०२१ ते जून २०२२ या कालावधीत लेप्टोस्पायरोसिस या आजाराने दोघे; तर स्वार्इन फ्ल्यूने एक जण दगावला असल्याची नोंद करण्यात आली; तर याच काळात डायरिया या आजाराचे दोन हजार १५१ तसेच हगवणीच्या ६२ रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
पावसाळ्याच्या काळात साथीचे तसेच जलजन्य आजार उद्भवू नये यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने ठाणेकरांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवलेल्या किंवा साचलेल्या पाण्यात, धुणी-भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घराच्या आसपास पडलेल्या नारळाच्या करवंट्या, वाहनांचे टायर्स, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेले हौसिंग सोसायट्यांचे ओव्हरहेड टँक्स आदींमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन वापरावे, इमारतीमधील व घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत, साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, साठवलेल्या पाण्याच्या ड्रम्सवर घट्ट झाकण बसवावे, सोसायटीच्या आवारात, मोकळ्या जागेत, टेरेसवर किंवा घराभोवती नारळाच्या करवंट्या, वाहनांचे टायर्स, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, तसेच सेप्टीक टँक त्वरित दुरुस्त करून घेऊन सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोट :-
दूषित पाण्यामुळे व उघड्यावर खाल्लेल्या अन्नामुळे जलजन्य आजारा बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात उघड्यावरील अन्न खाणे टाळावे.
- डॉ. भीमराव जाधव, मुख्य वैद्यकीय अधिकरी, ठामपा.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86905 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..