खरे शिवसैनिक असाल तर समोर या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरे शिवसैनिक असाल तर समोर या!
खरे शिवसैनिक असाल तर समोर या!

खरे शिवसैनिक असाल तर समोर या!

sakal_logo
By

ठाणे, ता. २४ ः ‘राज्यात जणू कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे आदेशच एक प्रकारे देण्यात आल्यासारखी परिस्थिती आहे. तोडफोड-आंदोलने होत आहेत; पण येताहेत अवघे चार जण. उल्हासनगरमधील माझ्या कार्यालयावरही दगडफेक झाली. चारपाच दगड मारून आंदोलनकर्ते पळून गेले. ‘खरे शिवसैनिक असाल तर समोर या’ असे थेट आव्हान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज शिवसेनेला ठाण्यात दिले. वडिलांच्या बंडानंतर आज प्रथमच खुलेआम मैदानात उतरलेल्या श्रीकांत शिंदे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. धमक्या कुणाला देता? एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून आणि धर्मवीरांच्या शिकवणीमुळे शांत आहोत, पण माथी भडकावण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील नाराजीचे हिंसक पडसाद मुंबईसह राज्यात आता उमटू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांना लुईसवाडीतील बंगल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी दुपारपासूनच शिंदे समर्थकांचे जथ्थे दाखल झाले. बंगल्याबाहेरील सर्व्हिस रोडवर एका गाडीवर चढून श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण असलेला झेंडा हाती घेत जमावाला संबोधित केले. ‘ठाण्यात अनेक वर्षे शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत आहे. तो असाच फडकवत ठेवणार. कारण आम्ही आजही शिवसैनिक आहोत’ असे ते म्हणाले. आज महाराष्ट्रात मोठी घडामोड घडली. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. अपक्षांसह ५० आमदारांनी शिंदेंवर विश्वास दाखवला आहे. खरे तर यानिमित्ताने आमदारांच्या मनातील विस्फोट पाहायला मिळत आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला; पण चांगले दिवस सामान्य शिवसैनिकाला दिसले नाहीत. आज राज्यात शिवसेनेची सत्ता आहे; पण कार्यकर्ता भगवा घेऊन लढत आहे. शिवसंपर्क अभियानात ही बाब प्रकर्षाने जाणवली असेही ते म्हणाले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराची दारे २४ तास कार्यकर्त्यांसाठी खुली असतात. पायाला भिंगरी लावून ते काम करतात. पूर असो वा कोविड, त्यांचे कार्य ठाण्याने नव्हे तर संपूर्ण राज्याने पाहिले आहे. कोविड काळात पीपीई किट घालून रुग्णालयात जाणारा हा एकमेव मंत्री होता असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. पुण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षावर हल्ला झाला. ज्या मदत कक्षाने हजारो जीव वाचवण्याचे कार्य केले, त्यावर असा हल्ला होणे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.

...तर एकनाथ शिंदेंचे काय चुकले?
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. आमदारांच्या निधीवाटपात दुजाभाव केला जात असल्याच्या तक्रारींचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, की सातारा आणि परभणीत शिवसंपर्क अभियानाच्या वेळी आमदारांनी आम्हाला निधी मिळत नसल्याचे सांगितले. नगरविकास विभागाकडून निधी मिळाला, तर राष्ट्रवादीचे पालकमंत्री डीपीटीसीमध्ये विकासकाम रोखून ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाण्यात शिवसेनेने असा दुजाभाव कधीच केला नाही. सत्ता असूनही अन्याय होत असेल आणि त्याविरोधात दाद मागितली तर एकनाथ शिंदे यांचे काय चुकले, अशी भावनिक साद घालण्याचाही प्रयत्नही खासदारांनी केला.

शक्तिप्रदर्शनाकडे पदाधिकाऱ्यांची पाठ
एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या शक्तिप्रदर्शनाकडे ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसले. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व माजी महापौर नरेश म्हस्के आणि दोनतीन माजी नगरसेवकांचीच उपस्थितीत होती. शक्तिप्रदर्शनाला आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो समर्थक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; परंतु पाचशे ते सातशे समर्थकांचीच गर्दी दिसली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86916 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..