
ठाण्याच्या चंदनवाडी शाखेने लावला फलक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : देशात ५०० सेना आल्या आणि गेल्या. टिकली ती फक्त शिवसेना... एकनिष्ठ राहिला तो शिवसैनिक. म्हणून तर पक्ष नेत्यांनी नाही शिवसैनिकांनी टिकवला आणि जोपर्यंत हा श्वास आहे, तोपर्यंत हा शिवसैनिक आहे... संपूर्ण ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे वातावरण तयार केले जात असताना शहरातील पहिली शिवसेना शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनवाडीत शिवसैनिकांनी हा फलक लावला आहे. आम्ही कोणत्याही नेत्याच्या बाजूने नसून शिवसेना या चार अक्षराशी बांधील असल्याची भावना या वेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. हा बालेकिल्ला उभा राहत असताना शहरातील पहिली शिवसेना शाखा उभी राहिली ती चंदनवाडी येथे. दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या शाखेचे भूमिपूजन केले; तर १९८१ मध्ये स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातील या पहिल्यावहिल्या शिवसेना शाखेचे थाटात उद्घाटन केले. तेव्हापासून या शाखेशी शिवसैनिकांची नाळ जोडली ती आताच्या राजकीय घडामोडीतही घट्ट टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात त्यांच्या समर्थनाचे बॅनर लावले जात आहेत. शनिवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर शक्तिप्रदर्शनही झाले. ठाण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला जात आहे; मात्र या गर्दीपलीकडे कोणत्याही परिणामाची चिंता न करता चंदनवाडी शिवसेना शाखेने शिवसेना या पक्षाशी बांधीलकी असणारा फलक लावला आहे. आम्ही जन्माला आलो ते शिवसेना हे शब्द ऐकतच. मोठे झालो ते शिवसैनिक म्हणूनच. त्यामुळे शिवसेना हा आमचा श्वास असून नेत्यांना नव्हे, तर या संघटनेला मानणारे आम्ही शिवसैनिक असल्याचे या वेळी शाखाप्रमुखांनी सांगितले. याचदरम्यान चंदनवाडी शाखेत शिवसेना समर्थनार्थ फलक लागल्याची कुणकुण लागताच चार ते पाच जणांच्या टोळक्याने येऊन फलकावरील मजकुराला काळे फासले. त्यामुळे चंदनवाडी परिसरात तणाव निर्माण झाला असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86929 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..