भंगार गोदामे अनियंत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंगार गोदामे अनियंत्रित
भंगार गोदामे अनियंत्रित

भंगार गोदामे अनियंत्रित

sakal_logo
By

दीपक घरत : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २७ : पालिका क्षेत्र आणि तालुक्यातील इतर भागांत भंगारावर प्रक्रिया करणारी हजारो गोदामे आहेत. मात्र, या गोदामांवर प्रशासनाच्या कोणत्याही विभागाचा अंकुश नसल्याने त्‍या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि मानवी शरीरासाठी घातक अशा गोष्टी केल्या जात आहेत. भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक ‘अ’ मध्ये मोडणाऱ्या अडिवली, किरवली, बीड, धरणा कॅम्प, धानसर, तसेच रोहिंजन परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार साहित्यावर प्रक्रिया करणारी गोदामे उभारली आहेत. तळोजा औद्योगिक परिसरातील देवीचा पाडा, वावंजे परिसरातही खासगी जागांवर गोदामांची संख्या मोठी आहे. प्रदूषण नियामक मंडळ, अग्निशमन दल अथवा भंगार साहित्यांवर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही परवानग्या गोदामधारक घेत नाहीत. या गोदामात आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक; तसेच इतर कारखान्यांतून काढण्यात येणाऱ्या भंगार साहित्यावर प्रक्रिया करण्यात येत असते. रासायनिक साहित्य असलेले ड्रम धुतले जातात. आगीमुळे वायुप्रदूषण, तसेच रासायनिक ड्रम धुतल्यानंतर होणारे जलप्रदूषण रोखणारी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध नाही. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात जल आणि वायुप्रदूषण होत आहे.

अनेक गोदामांमध्ये कोणत्याही प्रकारची अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध नाही. यापूर्वी घडलेल्या आगीच्या घटनांत कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पालिकेत समावेश होण्यापूर्वी ग्रामपंचायतींमधील अनागोंदी कारभारामुळे या भागात वाढलेल्या या अनधिकृत धंद्यांवर पालिकेच्या स्थापनेनंतर तरी वचक बसेल, अशी आशा नागरिकांना होती; मात्र अजून तरी कोणतीही ठोस कारवाई पालिकेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

कामगारांना माहितीचा अभाव
ग्रामीण भागात असणाऱ्या गोदामात कोणत्या प्रकारच्या साहित्यावर प्रक्रिया केली जाते, अकुशल कामगारांकरवी हाताळण्यात येत असलेली रसायने कामगारांच्या प्रकृतीवर काय परिणाम करू शकतात, याची माहितीच येथील कामगारांना नसल्याचे आढळून आले आहे. कारखान्यातून आणल्या जाणाऱ्या लोखंडी टाक्या कापणाऱ्या कामगारांचीही तीच अवस्था आहे.

अहवाल गुलदस्त्यात
धरणा येथील टायरच्या गोदामाला २६ नोव्हेंबर २०१७ रोजी लागलेल्या आगीनंतर पालिकेतर्फे गोदामांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाचे अधीक्षक आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आले होते. त्या वेळी अग्निशमन दलाचे अधिकारी व स्थानिक अधीक्षकांनी गोदामांची पाहणी केली होती; मात्र या पाहणीत काय आढळले, याचा अहवाल कधीच पुढे येऊ शकला नाही.

सर्वाधिक नोटीस प्रभाग ‘अ’ मध्ये
पालिकेमार्फत बजावण्यात आलेल्या नोटिसांनुसार सर्वाधिक अनधिकृत बांधकाम प्रभाग ‘अ’ मध्ये असल्याचे निदर्शनास येत आहे. या ठिकाणी तब्बल १६३ बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या या गोदामात कोणत्या प्रकारचे साहित्य ठेवण्यात येते, कोणती प्रक्रिया केली जाते, याची माहिती प्रशासनाला असणे अपेक्षित आहे. या गोदामांवर प्रशासनाचा अंकुश असणे गरजेचे आहे.
- सुनील भोईर, अध्यक्ष, तळोजा काँग्रेस पर्यावरण विभाग

बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या गोदामांना पालिका अधिनियम ५३ अ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्याचे उत्तर न देणाऱ्यांवर पालिका कारवाई करणार आहे. तसेच प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86969 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..