
तोतया पोलिसाने ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले
पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : पोलिस असल्याची बतावणी करून एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरल्याची घटना शनिवारी (ता.२५) कर्नाळा सर्कल येथील भाजी मार्केटमध्ये घडली. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील तोतया पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
ज्येष्ठ नागरिक सुकीर भोईर (वय ७०) हे धाकटा खांदा गावात कुटुंबासह राहण्यास असून शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ते पनवेल येथील एमएसईबीच्या कार्यालयात लाईट बिल भरण्यासाठी गेले होते. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भोईर हे कर्नाळा सर्कल येथील भाजी मार्केटजवळ आले असताना एका व्यक्तीने त्यांना पोलिस असल्याची बतावणी करून थांबवले. त्यानंतर त्याने पुढे पोलिस चेकिंग सुरू असल्याचे सांगून अंगावरील दागिने कागदात बांधून ठेवण्यास भोईर यांना सांगितले. यावेळी भोईर यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या गळ्यातील सोन्याची चेन काढली. त्यानंतर चोराने कागदात बांधून देण्याच्या बहाण्याने चेन आपल्याकडे घेऊन हातचलाखीने ती चोरली. रिकामा कागद भोईर यांच्या खिशात टाकून त्याने तेथून पलायन केले. भोईर काही अंतर चालत गेले असता पुढे कुठेही पोलिस तपासणी करताना त्यांच्या निदर्शनास आले नाहीत. त्यांनी खिशात सोन्याची चेन ठेवलेला कागद तपासला असता त्यात चेन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर भोईर यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86991 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..