
नवी मुंबईत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी आपल्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत; मात्र त्यानंतरदेखील शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे व इतर आमदारांचे खारघर येथे पुतळे जाळून आंदोलन केले. त्यामुळे खारघर पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीश घरत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीश घरत यांच्या वतीने शनिवारी दुपारी खारघर बेलपाडा येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते अनंत गीते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहर भोईर, शिरीश घरत, बबन पाटील यांनी मार्गदर्शन केले. बैठक संपल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर आलेल्या काही नेते व पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांच्या पुतळ्यांचे दहन करून निषेध व्यक्त केला आहे. खारघर पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिरीश घरत व त्यांच्यासोबत बबन पाटील, मनोहर भोईर, गुरुनाथ पाटील, शंकर पाटील, प्रकाश गायकवाड, परेश पाटील, यतीन देशमुख, अनिल पाटील, दीपक घरत यांच्यासह ४० ते ५० पदाधिकाऱ्यांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86992 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..