ठाण्यात शिवसेनेची मोट घट्ट करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात शिवसेनेची मोट घट्ट करणार
ठाण्यात शिवसेनेची मोट घट्ट करणार

ठाण्यात शिवसेनेची मोट घट्ट करणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः राज्यात सुरू असलेल्या बंडनाट्याचा अंक ठाण्यातून लिहिला गेला. या नाट्याचे प्रमुख पात्रही ठाण्यातीलच असल्यामुळे येणाऱ्या काळात आपला पारंपरिक ‘फड’ शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेच्या श्रेष्ठींनी आता ठाण्याकडे मोर्चा वळवला आहे. जिल्हाप्रमुख, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राजीनामा दिल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मोट घट्ट करण्यासाठी गाठीभेटी वाढवल्या आहेत. येत्या दोन दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः येथील सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड मानला जातो; मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे या गडाला सुरुंग लागला आहे. शिंदे यांच्या समर्थनासाठी अनेक पदाधिकारी पुढे आले आहेत; मात्र त्याच वेळी शिंदे यांच्या वर्चस्वामुळे गेली अनेक वर्षे घुसमट होत असलेल्या निष्ठावंतांची जुनी फळीही आता शिवसेनेला वाचवण्यासाठी सक्रिय होताना दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक कट्टर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील नेत्यांशी गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यातच शनिवारी जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ठाण्यात विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी ठाणे शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.

जिल्ह्यातील शाखाप्रमुखांपासून ते विभागप्रमुख, शहरप्रमुखांना शिवसेनेतच रोखून ठेवण्याची जबाबदारी खासदार राजन विचारे यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. याविषयी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दैनिक ‘सकाळ’ला दिलेल्या माहितीनुसार ठाण्याच्या हालचालींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बारीक नजर आहे. येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे येथील पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87010 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..