
जव्हारमधील टॅंकरच्या डिझेलसाठी निधी उपलब्ध
मोखाडा, ता. २७ (बातमीदार) ः पुरेसा पाऊस पडत नसल्याने जव्हार तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र डिझेलसाठी निधी उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा करणारे टॅंकर आठ दिवसांपासून बंद होते. त्यामुळे टंचाईग्रस्त गाव-पाड्यांतील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. या घटनेचे वास्तव ‘सकाळ’ने ‘इंधनाअभावी पाणीपुरवठा नाही’ या मथळ्याखाली २६ जून रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची जिल्हा परिषद अध्यक्षा आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. जव्हारमधील टॅंकरला तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सोमवारपासून टँकरने नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
जव्हार तालुक्यात नियमित पावसाळा सुरू झालेला नसल्यामुळे येथील विहिरी अजूनही कोरड्याच आहेत. जव्हारमध्ये गेले तीन महिन्यांपासून टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र पंचायत समिती प्रशासनाने टॅंकरच्या इंधनाच्या खर्चासाठी निधी नसल्याचे कारण देऊन हा टॅंकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे टंचाईग्रस्त गाव-पाड्यांमधील आदिवासींना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागले.
लगेच सूत्रे हालली
या घटनेचे भीषण वास्तव ‘सकाळ’ने चव्हाट्यावर आणले. त्याची दखल जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी घेतली आणि जिल्हा परिषद प्रशासनाला टॅंकरच्या इंधनासाठी निधी देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे तातडीने जव्हार पंचायत समितीला टँकरच्या इंधन खर्चासाठी सुमारे १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून सोमवारपासून टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87087 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..