
शिवसेना सोडणार नाही - आमदार सुनील राऊत
मुंबई, ता. २७ (बातमीदार) : नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत गट तयार करून गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला आहे. शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्यासोबत असून आणखी काही गुवाहाटीच्या मार्गावर आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हेही काल बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. सकाळपासून ते नॉट रिचेबल होते; मात्र सायंकाळी सामंत गुवाहटीला जाऊन शिंदे गटाला भेटले. गटातील अपक्षांसह आमदारांची संख्या आता ४६ वर गेली आहे. खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर सडकून टीका करत आहेत. शिवसेनेची तोफ समजल्या जाणाऱ्या संजय राऊत यांचे बंधू एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. सर्व बंडखोरांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद असल्याचा दावा संजय राऊत करत आहेत; मात्र आता त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हेच शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी शिवसेना घरातच फुटली की काय, असा सवाल विचारला जात होता. सुनील राऊत यांनी ही चर्चा फेटाळून लावली. आमच्या बदनामीचा डाव असल्याचेही ते म्हणाले. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बाळासाहेब असतानापासून माझे वडील शिवसैनिक होते. आमदारकी माझ्यासाठी मोठी नाही, आम्हाला कापलं तरी शिवसेना आणि बाळासाहेबांना सोडणार नाही, असे स्पष्टीकरण केले. तसेच आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि शिवसेनेत राहणार आहोत, बाकीच्या बातम्या केवळ जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत, असे आमदार सुनील राऊत यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87134 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..