
दिंडीमधील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा
अंबरनाथ, ता. २९ (बातमीदार ) : आळंदीपासून पंढरपूरला आषाढीनिमित्त विठू नामाच्या जयघोषात निघणाऱ्या वारीमधील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा आणि महाप्रसाद देण्यासाठी अंबरनाथ येथील काही डॉक्टर्स आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी पुढाकार घेतला.
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे या उपक्रमात खंड पडला होता. मात्र, या वर्षी त्याच उत्साहात वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यात आली.
माऊली ट्रस्टमार्फत गेल्या ३० वर्षांपासून डॉ. मोहिते यांच्या प्रयत्नातून ही सेवा चालू आहे. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या वतीने २०१८ सालापासून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष डॉ. गुणवंत भंगाळे, प्रकल्प प्रमुख ईश्वरलाल चव्हाण, डॉ. श्रीकांत गर्जे, डॉ. लीना धांडे, डॉ. सागर धडस, संजय साळुंके, रोहित चलवादी, व्यकंटेश अय्यर यांच्यासह ट्रस्ट आणि क्लबच्या अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांनी रविवार, २६ जून रोजी वारकरी आरोग्य सेवेसाठी दिंडी मार्गावरील जेजुरीला गेले, त्याठिकाणी महाप्रसाद आणि दोन हजार कफ सिरफ, एक हजार बामच्या बाटल्या, तसेच त्वचेच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या औषधांचे आणि महाप्रसादाचे वाटप केले. यापुढेही दरवर्षी हा उपक्रम सुरू ठेवला जाणार असल्याचे डॉ. धडस यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87191 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..