
प्रस्तावित वाढवण बंदराची अज्ञात ड्रोनद्वारे पाहणी
डहाणू, ता. २८ (बातमीदार) ः प्रस्तावित वाढवण बंदराचा समुद्रकिनारा आणि वरोर, टीघरेपाडा, वाढवण गावच्या नागरी वस्तीची रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या साह्याने छुपी पाहणी केल्याचे सांगण्यात येत आहे. या पाहणीचा तपास तात्काळ करण्यात यावा, अशी मागणी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने एका पत्राद्वारे पालघर पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
डहाणू तालुका हा पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील विभाग आहे. येथील समुद्रात सरकार बळाचा वापर करून बंदर उभारू पाहत आहे, अशी टीका येथील नागरिक करतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच बंदरविरोधी आंदोलने होत असतात. अशा या संवेदनशील प्रस्तावित वाढवण बंदराच्या समुद्रावर आणि वरोर, टिघरेपाडा, वाढवण गावच्या नागरी वस्ती परिसरात २५ आणि २६ जून रोजी रात्रीच्या वेळेस १०-१२ अज्ञात ड्रोनद्वारे पाहणी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. रात्र असल्याने ड्रोनची छायाचित्रे घेता येत नाहीत. येथे जवळच तारापूर अणूशक्ती केंद्र आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची अफवा परिसरात पसरली आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय प्रस्तावित वाढवण बंदराच्या रस्त्याच्या कामाचे मोजमाप करण्याचे काम रात्रीच्या अंधारात ड्रोनद्वारे केले जात असावे, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे केल्या जाणाऱ्या पाहणीचे नियंत्रण नेमके कोणत्या ठिकाणाहून केले जाते आणि ते कोण करीत आहे, याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87202 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..