
मानवीवस्तीत सापांचा शिरकाव
वसई, ता. २८ (बातमीदार) ः पावसाळा सुरू झाल्यावर बिळात लपलेल्या सापांनी मानवी वस्तीत शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गृहसंकुलात व औद्योगिक वसाहतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सापांपासून सुरक्षित राहता यावे याकरिता सर्पमित्र अथवा अग्निशमन दलाच्या जवानांना नागरिक संपर्क करू लागले आहेत.
वसईत मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आहे. इमारतींचा परिसर, घराचे आवार, गॅरेज, सार्वजनिक उद्याने आदी ठिकाणी विषारी व बिनविषारी सापांचा मुक्त संचार सुरू आहे. शेतजमीन व गृहसंकुलात उंदरांचा वावर अधिक असल्याने पावसाळ्यात भक्ष्याच्या शोधात साप मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे बाहेर खेळण्यासाठी येणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह रहिवाशांना सर्पदंश होण्याची भीती निर्माण झाली आहे. सातिवली, वालीव, गोलानी, विरार, चंदनसार, कामण, शिरसाड, चिंचोटी, पेल्हारसह औद्योगिक वसाहतीतदेखील साप शिरू लागले आहेत. कारखान्यात अडगळीची ठिकाणे अधिक असल्याने हे साप लपून भक्ष्य शोधत असतात. या सापांमध्ये घोणस, मण्यार यासह अनेक बिनविषारी सापांच्या जाती फिरत आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---
अवेळी पाऊस, तापमानात वाढ अशा वातावरण बदलामुळे डोंगराळ व निर्जन ठिकाणी असणारे साप मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. सर्पदंश झाल्यास माणसाला जीव गमवावा लागल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी.
- विलास चोरघे, माजी नगरसेवक
---
आमच्या इमारतीत रात्रीच्या सुमारास एका सदस्याला साप दिसला. त्यामुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. अशा वेळी अग्निशमन दलाच्या जवानांशी संपर्क केला व त्यांनी त्वरित येऊन साप पकडून नेला.
- रवी पाठक, रहिवासी, वसई
---
काय काळजी घ्याल
साप दिसल्यास अग्निशमन दल, सर्पमित्रांना संपर्क साधा. सापाला काठी दाखवू नये, मारू नये. इजा पोहचवू नये. लपलेल्या सापापासून अंतर बाळगावे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87204 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..