
तीन वर्षांनंतर ५९ क्रमांकाची बससेवा पूर्ववत
नवीन पनवेल, ता. २८ (वार्ताहर) : नवीन पनवेल व खांदेश्वर येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली नवी मुंबई परिवहनची ५९ क्रमांकाची बससेवा पूर्ववत झाली आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानक ते नवीन पनवेल रेल्वे स्थानक पूर्व या मार्गावर धावणारी नवी मुंबई परिवहन विभागाची सेवा तीन वर्षांनंतर कार्यरत झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवीन पनवेल व खांदेश्वर येथील प्रवाशांच्या सोयीची ठरणारी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाची ५९ क्रमांकाची बससेवा तीन वर्षांपूर्वी बंद झाली होती. त्यामुळे या मार्गावर खासगी वाहने व रिक्षावाले प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत होते. त्याला कंटाळून बससेवा पूर्ववत होण्यासाठी या ठिकाणच्या प्रवासी संघटना व नागरिकांनी नवी मुंबई परिवहनकडे वारंवार अर्ज व विनंत्या केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे.
बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने रिक्षा चालक व खासगी वाहनांच्या मनमानी भाडेआकारणीला चाप बसणार आहे. अखिल भारतीय छावा संघटना, खासदार श्रीरंग बारणे, प्रसाद परब, शशी नायर, प्रवीण जठार व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यासह नवीन पनवेल व खांदेश्वर येथील नागरिकांनी या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या सेवेचे येथील प्रवासी व नागरिकांनी स्वागत केले आहे. भविष्यामध्ये या मार्गावरील फेऱ्या वाढवणार असल्याचे नवी मुंबई परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा प्रवासासाठी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बस मार्ग
खांदेश्वर रेल्वे स्थानक- खांदा कॉलनी- आदई तलाव- आदई/सुकापूर सर्कल- बांठिया शाळा- नवीन पनवेल रेल्वे स्थानक
बसची वेळ
सकाळी ६ ते १२ वाजता, तसेच संध्याकाळी ४ ते रात्री १० या वेळेत बसेस प्रत्येकी ३० ते ३५ मिनिटांनी उपलब्ध.
प्रवासभाडे
खांदा कॉलनी ते खांदेश्वर रेल्वे स्थानक- ७ रुपये.
खांदेश्वर रेल्वे स्थानक ते आदई तलाव- ९ रुपये.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87213 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..