पीओपी मूर्ती कारागिर आर्थिक संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीओपी मूर्ती कारागिर आर्थिक संकटात
पीओपी मूर्ती कारागिर आर्थिक संकटात

पीओपी मूर्ती कारागिर आर्थिक संकटात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९ : जेमतेम दोन महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी पेण येथील लाखो गणेशमूर्ती विक्रीसाठी देशभरात रवाना झाल्या आहेत; तर तितक्याच मूर्तींवर कारागीर शेवटचा हात फिरवत आहेत. असे असतानाच पीओपीवरील बंदी कायम ठेवण्याच्या निर्णयाने कारखान्यांतील लगबग अचानक मंदावली आहे. पेण तालुका गणेशमूर्ती निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः पीओपीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींना चांगली मागणी असल्याने तालुक्यातील हजारो कारागिरांनी या व्यवसायात स्वतःला गुंतवून घेतले, पण या निर्णयामुळे हाच व्यवसाय त्यांना आर्थिक संकटात नेणारा ठरत आहे.

मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील कारागिरांचा पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी कायदेशीर लढा सुरू आहे. सुरुवातीला हरित लवादाकडे दाद मागितल्यानंतर दिल्ली सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा लढला गेला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवरील बंदी आणण्याचा यापूर्वी दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. हा निकाल सोमवारी समजताच येथील मूर्तिशाळांमधील हालचाल अचानक मंदावली. मागील दोन वर्षे कोरोना आणि महापुरात नुकसान झालेल्या मूर्ती कारखानदारांचा कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. एकट्या पेण तालुक्याचा विचार केल्यास ५० कोटींपेक्षा जास्त कर्ज कारखानदारांच्या डोक्यावर आहे. यात बंदीमुळे साधारण १५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
पेण येथून पीओपीपासून तयार केलेल्या मूर्ती इतर शहरांमध्ये व्यापारी विक्रीसाठी नेतात. हे व्यापारी नेहमीचे असल्याने मूर्तींची विक्री झाल्यानंतरच मूर्तींची मूळ रक्कम कारखानदारांना परत करत असतात. न्यायालयाच्या बंदीमुळे ग्राहक मूर्तींची अपेक्षित किंमत देण्यास तयार होणार नाहीत. जर का स्थानिक प्रशासनाने पीओपीवरील बंदीची सक्तीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली तर पाठवलेल्या काही मूर्ती न विकता परत पाठवल्या जाऊ शकतात. याचा मोठा फटका येथे घरोघरी चालणाऱ्या गणेशमूर्ती कारखानदारीला बसण्याची शक्यता आहे.
-----
बँकांकडून आखडता हात
पेण तालुक्यात गणेश उद्योग हा मोठ्या प्रमाणावर असून बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकांकडून गणेशमूर्ती कारखानदारांना सुमारे १५० कोटींचा पतपुरवठा करण्यात येतो. गणेशमूर्ती उद्योगाची उलाढाल सुमारे ३०० कोटींची होते. मागील दोन वर्षे सातत्याने नुकसान होत असल्याने पतपुरठा करणाऱ्या बॅंकांनीही आखडता हात घेतला आहे. यामुळे भविष्यातील आर्थिक संकट डोकावू लागले आहे.
-----------
गणेशमूर्ती बनवण्यासाठी केलेली गुंतवणूक पुन्हा काढून घेता येणे शक्य नाही. कच्चा माल, रंगरंगोटी, कारागिरांची मजुरी दिलेली आहे. काही मूर्ती बाजारात दाखल झालेल्या असताना कायम ठेवण्यात आलेल्या बंदीमुळे कारागीर आर्थिक संकटात सापडणार आहेत. राज्यात मूर्तिकलेवर साधारण २२ लाख व्यक्तींचा उदरनिर्वाह चालत आहे, त्यांच्यावरही परिणाम होणार आहे.
- रविकांत म्हात्रे, श्रीगणेश मूर्तिकार प्रतिष्ठान, अध्यक्ष, महाराष्ट्र
------------
पीओपी मूर्तींवरील बंदी उठवण्याच्या लढ्यात शाडूच्या मातीपासून होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाले. राष्ट्रीय हरित लवादाकडे शाडूच्या मातीपासून होणारे दुष्परिणाम मांडण्यात येतील. गणपती हे सर्वांचे आराध्य दैवत असल्याने पीओपीवरील बंदीची अंमलबजावणी कशाप्रकारे करणार याबद्दल काहीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून पुढील रणनिती ठरविण्यात येईल.
- अजय वैशंपायन, सामाजिक कार्यकर्ते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87220 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top