
मुलुंड पूर्वेतील पथदिवे पूर्ववत
मुलुंड पूर्वेतील पथदिवे पूर्ववत
मुलुंड, ता. २९ (बातमीदार) ः मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी येथील आर. आर. एज्युकेशनजवळील रस्त्यावरचे पथदिवे गेल्या २० दिवसांपासून बंद होते. याबाबत रहिवाशांनी म्हाडा असोसिएशनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रवी नाईक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर नाईक यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला. महावितरण मुलुंडचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांनी दखल घेत नवीन केबल टाकण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यामुळे येथील रस्त्यावरील तुटलेले केबलच्या जागी नवीन केबल टाकून पथदिवे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
---
राजाराम शेठ विद्यालयाला पंचतारांकित नामांकन
मुलुंड, ता. २९ (बातमीदार) ः भारत सरकारच्या शालेय शिक्षण व प्रौढ साक्षरता विभागाच्या शिक्षण मंत्रालयाने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ अभियाना अंतर्गत विविध नामांकने जाहीर केली. यात भांडुप पश्चिम खिंडीपाडा येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजाराम शेठ विद्यालय व सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयाची निवड करण्यात आली. त्यांना जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पंचतारांकित (फाईव्ह स्टार ) नामांकनाने सन्मानित करण्यात आले. खिंडीपाडा परिसर गोरगरीब कष्टकरी, दलित, मागासवर्गीय लोकवस्तीचा असून अशा परिसरात या दोन्ही शाळा गेली २८ वर्षे विद्यादानाचे कार्य करत आहेत. शिक्षण उपसंचालक बृहन्मुंबई यांनी शिक्षण उपनिरीक्षक रंजना राव यांनी हा पुरस्कार नुकताच एका शानदार सोहळ्यात शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर व अन्य शिक्षकांना प्रदान केला.
---
मुलुंडमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन
मुलुंड, ता. २९ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड आरोग्य विभाग आणि फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने एका आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.३) सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान सेवा संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहामध्ये हे शिबिर होणार आहे. आरोग्य तपासणी पूर्णपणे मोफत असून सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87267 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..