महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अनामत रकमेची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अनामत रकमेची तपासणी
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अनामत रकमेची तपासणी

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अनामत रकमेची तपासणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २९ : महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून तारण म्‍हणून अनामत रक्कम घेतली जाते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयातून बाहेर पडतो, त्यावेळी ही रक्कम त्या विद्यार्थ्यांना तात्काळ परत देणे अपेक्षित असते. अनेकदा ही रक्कम विद्यार्थ्यांना परत दिली जात नसून, ती महाविद्यालयाकडे पडून राहते. महाविद्यालयांमधील या अनामत रकमेची उच्च शिक्षण विभागाकडून तपासणी केली जाणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९४ उच्च शिक्षण महाविद्यालयांचा समावेश आहे.
उच्च महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून ८०० ते २ हजारांपर्यंतची अनामत रक्कम घेतली जाते. या रकमेचा विनियोग कसा करावा याबाबत उच्च शिक्षण संचालयाने २०१४ मध्ये परिपत्रक काढले होते. या परिपत्रकानुसार, या रकमेचा विनियोग गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करणे आवश्यक आहे. या घटकातील विद्यार्थी आर्थिक चणचणीअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांना वसतिगृह व मेस फी, शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके, दप्‍तर, वैद्यकीय सुविधा, कमवा व शिका योजनेसाठी निधी उपलब्ध करणे, या ४ घटकांवर राज्यातील सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित ३ हजार १४१ उच्च शिक्षण महाविद्यालयांनी शिल्लक असलेली एकूण अनामत रक्कम खर्च करणे अपेक्षित आहे; परंतु ही रक्कम महाविद्यालयांमध्ये वर्षांनुवर्षे पडून आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९४ उच्च शिक्षण महाविद्यालयांचा समावेश असून, यात ३४ अनुदानित महाविद्यालये आणि १६० विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. या अनामत रकमेमधील ३० टक्के रक्कम आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याबाबतचे परिपत्रक तात्काळ काढावे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी सरकारकडे केली आहे.
........
अनामत रकमेबाबत कोणती कार्यवाही
राज्यातील ५४ महाविद्यालयांकडे १४ कोटी अनामत रक्कम असून, यामध्ये ठाणे जिल्ह्यातील तीन महाविद्यालयांचाही समोवश आहे. ज्याची रक्कम सुमारे १ कोटीहून अधिक आहे. उच्च शिक्षण विभागातील संस्थांमध्ये अनामत रक्कम शिल्लक असल्याबाबत तपासणी करून त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा. तसेच विद्यार्थ्यांनी परत न घेतलेल्या अनामत रकमेबाबत अधिनस्त संस्थांकडून कोणती कार्यवाही करण्यात येते, याची माहिती संचालनालयास सादर करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी सर्व विभागीय सहसंचालक यांना दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87286 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top