बांधकाम मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर
बांधकाम मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर

बांधकाम मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर

sakal_logo
By

पनवेल, ता. २९ (बातमीदार) ः तळोजा फेज २ मध्ये निर्माणाधीन इमारतीच्या चौदाव्या मजल्‍यावरून ट्रॉली कोसळून मंगळवारी (ता. २८) झालेल्‍या दुर्घटनेत कंत्राटदारासहित चार मजुरांना प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
झपाट्याने विकास होत असलेल्या पनवेल, नवी मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात इमारतींची कामे सुरू आहेत. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मजूर काम करतात. कायद्यानुसार, बांधकामच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेविषयक साधन-सामग्री पुरवणे आवश्‍यक आहे; मात्र बांधकाम व्यावसायिक अथवा कंत्राटदाराकडून त्‍याकडे दुर्लक्ष होत असल्‍याने इमारतींवरून पडून कामगारांना जीव गमवावा लागल्‍याच्या घटना गेल्‍या काही दिवसांत समोर आल्‍या आहेत.
कामगारांना सुरक्षेसाठी बांधकाम सुरू असताना, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हातमोजे, सेफ्टी शूज व इमारतीच्या बाजूला जाळ्या अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे; मात्र तसे होत नसल्याने अपघात घडतात. अनेकदा इमारती बांधण्यापूर्वी खोदकाम केले जाते, त्‍यात पाणी साचते. मजुरांच्या राहण्याच्या खोल्याही इमारतीलगत असल्‍याने लहान मुलेही परिसरात खेळत असतात. अशा वेळीही अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. इमारतीचे रंगकाम, दुरुस्‍ती करताना अनेकदा सेफ्टी बेल्‍टही पुरवला जात नसल्‍याचे दिसून येते. प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेत बांधकाम व्यावसायिक अथवा कंत्राटदारांना सुरक्षाविषयक साधन-सामग्री पुरवण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. तसे होत नसल्‍यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सरकारी योजनांना मजुरांचा प्रतिसाद नाही
कल्याण मंडळांच्या माध्यमातून इमारत आणि इतर बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. कल्याण मंडळांच्या माध्यमातून याकरता प्रयत्न करण्यात येतात; मात्र मजुरांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने अपघातानंतर मजुरांच्या नातेवाईकांना योजनेचा लाभ मिळवताना अडचणी येतात.

उपाययोजना राबवणे आवश्यक
निर्माणाधीन इमारतीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हातमोजे, सेफ्टी शूज व इमारतीच्या बाजूला जाळ्या अशा उपाययोजना राबवणे आवश्यक आहे; मात्र अनेकदा बांधकाम व्यावसायिक अथवा कंत्राटदारांकडून त्‍याकडे दुर्लक्ष करण्यात येते.

कामगाराच्या मुलीचा मृत्यू
खांदा वसाहत, सेक्टर १७ येथे सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामादरम्यान सहाव्या मजल्यावरून पडून कामगाराच्या सहावर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २८) घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीभोवती कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी लावण्यात आली नव्हती. घटनेची नोंद कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

इमारतीचे काम सुरू असताना मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना राबवण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आल्यास आमच्या विभागाकडून संबंधितास नोटीस बजावण्यात येते आणि त्यानंतर कारवाई केली जाते.
- शीतल कुलकर्णी, सहायक कामगार आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87295 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..