
मुंबईला डेंगीचा विळखा
मुंबई, ता. २९ : मुंबईत पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाळी आजार डोके वर काढतात; मात्र पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईतील इतर पावसाळी आजार नियंत्रणात असून डेंगीचे रुग्ण मात्र वाढत आहेत. परिणामी आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. मुंबईतील दोन प्रमुख प्रभागांमध्ये डेंगीचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ई आणि एस प्रभागात मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण सापडत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
ई प्रभागातील रे रोड आणि मदनपुरा परिसर व एस वॉर्डातील कन्नमवार नगर अन् टागोर नगर परिसरात डेंगीमुळे चिंता वाढली असल्याची माहिती पालिका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जूनच्या २६ दिवसांत मलेरियाचे ३१४, गॅस्ट्रोचे ४५६ आणि स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत जानेवारी ते जूनपर्यंत स्वाईन फ्लूचे चार रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेसह पावसाळी आजारांचा ताप वाढला आहे. पावसाच्या आगमनापूर्वीच साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. १ ते २६ जूनपर्यंत मलेरिया, डेंगी, कावीळ, लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनिया आदी साथीचे आजार बळावत असून थंडीत पसरणाऱ्या स्वाईन फ्लूचाही धोका वाढला आहे. सर्वाधिक धोका डेंगीचा असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
१ ते २६ जूनपर्यंतची रुग्णसंख्या
मलेरिया ः ३१४
गॅस्ट्रो ः ४५६
कावीळ ः ५७
डेंगी ः ३३
लेप्टो ः ११
स्वाईन फ्ल्यू ः २
चिकनगुनिया ः १
गॅस्ट्रोचे रुग्णही वाढताहेत
गेल्या वर्षीच्या जूनमध्ये डेंगीचे फक्त १२ रुग्ण आढळले होते. ही संख्या यंदाच्या जून महिन्यात वाढून ३३ वर पोहोचली आहे. गॅस्ट्रोचेही रुग्ण गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास तीन पट नोंदले गेले आहेत. गेल्या वर्षी गॅस्ट्रोचे १८० रुग्ण आढळले होते. या वर्षी ४५७ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये चिकनगुनियाच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87299 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..