
शालेय पोषण आहार सुरु करण्याची मागणी
कासा, ता. २९ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे बंद करण्यात आले आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक गरीब कुटुंबांच्या हाताला काम नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च कोण उचलणार, हा प्रश्न आधीच निर्माण झाला होता. किमान विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न तरी शाळेत सुटत होता, पण आता आहाराची समस्याही पालकांना सतावू लागली आहे. त्यामुळे शाळेतील पोषण आहार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
दुर्गम भागातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकण्यासाठी येतात. दुपारचे जेवण येथे मिळेल ही आशा त्यांना असते, पण शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नसल्यामुळे माध्यान्ह भोजन आहार बंद आहे. ग्रामीण भागातील पालक सकाळी उठून लवकर कामावर जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी दुपारच्या वेळच्या डब्याची सोय करू शकत नाहीत. जेवण शिजवून देण्यासाठी त्यांच्याकडे धान्यही उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळी उपाशी राहावे लागते.
कोरोना संसर्गाच्या काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे शालेय पोषण आहारही बंद होता. काही दिवस विद्यार्थ्यांना कोरडा शिधा दिला जात होता, परंतु आता तोही बंद आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत; मात्र अद्यापही मुलांना शाळेतून पोषण आहार दिला जात नाही. त्यामुळे पटसंख्येवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. कष्टकऱ्यांच्या मुलांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. भुकेल्यापोटी शिक्षणाचे धडे गिरवायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
---
कोट-
शाळा सुरू झाल्या, परंतु अजूनही आम्हाला खिचडी शिजवून मिळत नाही. आठवड्यातून एकदा बिस्कीट मिळत नाही.
- सुरेखा गावित, विद्यार्थिनी.
---
कोट-
रानशेत पाटील पाडा येथील शाळेतील मुलांना दुपारचे अन्न मिळत नाही. याबाबतीत पंचायत समितीमध्ये विचारणा केली असता पुढील आठवड्यात धान्य पुरवठा नियमित सुरू होईल असे सांगण्यात आले.
- गोविंद बोलाडा, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
------
कोट -
ग्रामीण भागात धान्य पुरवठा लवकर सुरू करावा. पोषण आहाराबरोबर शारीरिक व बौद्धिक समस्या सोडवण्याची गरज आहे.
- अमित घोडा, माजी आमदार
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87314 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..