
नावांचा घोळ प्रस्थापित उमेदवारांच्या पथ्यावर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ ः नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये निर्माण झालेला मतदारांच्या नावाचा घोळ प्रस्थापित उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे. एका प्रभागात राहत असणाऱ्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशा मतदारांकडे काही लोकप्रतिनिधींनी पुरावे मागितले आहेत. परंतु संबंधित मतदारांनी लोकप्रतिनिधींकडे पुरावे देण्यास नकार दिल्याने गेलेल्या मतदारांच्या नावासाठी हरकती घेताना अडचण येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, महापालिकेने आगामी निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली. मतदार यादीतील चुका दुरुस्ती करण्यासाठी येत्या १ जुलैपर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यावर होणाऱ्या सुनावणीअंती अंतिम मतदार यादी जाहीर होईल. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या ४१ प्रभागांच्या मतदार यादीत बहुतांश मतदारांची नावे ते राहत असणाऱ्या ठिकाणी न येता शेजारच्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. दुसऱ्या प्रभागात गेलेल्या मतदारांची संख्या सरासरी ५०० पेक्षा जास्त असल्यामुळे नवख्या उमेदवारांना या मतदारांचा मोठा फटका बसणार आहे. ही नावे पुन्हा आहे, त्याच पत्त्यावरील मतदार यादीत समावेश व्हावा याकरिता उमेदवारांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे धावपळ सुरू केली आहे. मतदार यादीतील स्थलांतरित झालेली नावे आणि प्रत्यक्ष पत्ते अधिकाऱ्यांना दाखवले जात आहेत. परंतु एवढे होऊन सुद्धा महापालिकेचे अधिकारी ही नावे पुन्हा पूर्वीच्या प्रभागात आणण्यासाठी पुरावे म्हणून मतदारांचे रहिवासी पत्ता आणि ओळखपत्र सादर करण्यास लोकप्रतिनिधींना सांगत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसमोर हरकती सादर करताना अनेक अडचणी येत आहेत. ही नावे भलत्याच प्रभागात गेल्यामुळे त्याचा फायदा दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांना होणार आहे.
महापालिकेला तीन चुका दुरुस्त करण्याचे अधिकार
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर घेण्यात येणाऱ्या हरकतींवर महापालिका सुनावणी घेते. सुनावणीनंतर ते निवडणूक आयोगाला पाठवले जाते. नवी मुंबई महापालिकेने २०१९ विधानसभा निवडणुकींतील मतदार यादीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार केल्या आहेत. यातील तीन बदल महापालिका स्तरावर करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना कार्यालयीन चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे आणि विधानसभेच्या वेळेस यादीत असणारे नाव आता जाहीर केलेल्या मतदार यादीत नसणे अशा तीन चुका महापालिका दुरुस्त करू शकते.
एका प्रभागात वास्तव्यास असणाऱ्या मतदारांचे दुसऱ्या प्रभागात नावे असल्यास ती चूक दुरुस्त करता येऊ शकते. फक्त त्याकरिता हरकत घेताना संबंधित मतदारांच्या नावांचे व अधिवासाचा पुरावा महापालिकेकडे सादर करावा.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
‘ट्रू वोटर’वर करू शकता हरकत
मतदार यादीतील नावांची, पत्त्याबाबत काही दुरुस्ती असल्यास अर्जदारांना प्रत्यक्ष कागदोपत्री पुराव्यांसह हजर राहून तक्रार करण्याची गरज नाही. राज्य निवडणूक आयोगाने त्याकरिता ट्रू वोटर नावाचे ॲप्लिकेशन तयार केले आहे. या ॲप्लिकेशनवर घर बसल्या कागदपत्रे अपलोड करून तक्रार करता येणार आहे.
६२ हजार ९०९ नावे रद्द
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकूण ८ लाख ४५ हजार ४४२ मतदारांची संख्या आहेत. या यादीतील ६२ हजार ९०९ जणांची नावे वगळण्यात आल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87325 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..