
सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात
मुंबई, ता. २९ : शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे राज्यातील परिस्थिती अस्थिर झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार उद्या गोव्याहून मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) वापर करण्यात येणार आहे. तीन विशेष विमानांनी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. त्याशिवाय राज्य पोलिसांनाही बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे. शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
विधान भवनात कडेकोट सुरक्षा
गुरुवारी विधानसभेत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात हायव्होल्टेज ड्रामा होणार असल्याच्या शक्यतेमुळे अतिरिक्त बंदोबस्त ठेवला जाणार आहे. विधान भवन परिसरात पाचशेहून अधिक पोलिस तैनात असणार आहेत. मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होणार असल्याने दोनशे पोलिस व राज्य राखीव दलाच्या तुकड्या विधान भवनाबाहेर बंदोबस्तासाठी असणार आहेत.
मुंबईला छावणीचे स्वरूप
मुंबई शहरात बंदोबस्ताच्या दृष्टीने २० पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, ४५ सहाय्यक पोलिस आयुक्त, २२५ पोलिस निरीक्षक, ७२५ सहाय्यक पोलिस निरीक्षक, २५०० पुरुष आणि १२५० महिला पोलिस हवालदार तैनात करण्यात येणार आहेत. कायदा-सुव्यवस्थेची घटना घडू नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने राज्य राखीव पोलिस दलाच्या दहा कंपन्या नेमण्यात आल्या आहेत.
राजकीय पक्षांना नोटिसा
विधान भवन परिसरात ओळखपत्राव्यतिरिक्त कुणालाही प्रवेशास बंदी असेल. पोलिसांकडून यापूर्वीच १४४ सीआरपीसीअंतर्गत मुंबईत नोटीस जारी करण्यात आल्यामुळे कुठेही कार्यकर्ते जमण्यास मनाई असणार आहे. मुंबई पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष आदी विविध पक्षांच्या नेत्यांना नोटिसा पाठवल्या असून कोणतीही भडक वक्तव्ये किंवा आक्षेपार्ह पोस्ट करू नका, असे आवाहन केले आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87368 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..